युतीसाठी शिवसेनेने भाजपाला झुलवीत ठेवले !
By admin | Published: October 31, 2016 11:15 PM2016-10-31T23:15:59+5:302016-10-31T23:15:59+5:30
कृषी मंत्री फुंडकर यांचा आरोप, सरकारच्या यशोगाथेमध्ये भाजपाचा उदोउदो, सेनेचा उल्लेखही नाही.
अकोला, दि. ३१- नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेनेने राज्य स्तरावर युती जाहीर केली; मात्र ही युती ऐनवेळी जाहीर झाल्याने जिल्हा व तालुका स्तरावर युती होऊ शकली नाही. परिणामी, सत्तेतील हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभे ठाकणार आहेत, हा प्रकार केवळ शिवसेनेने लवकर निर्णय न घेतल्यामुळे झाला. युती करण्यासाठी सेनेने भाजपाला अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवले, असा आरोप कृषी मंत्री भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी कृषी मंत्री फुंडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री फुंडकर म्हणाले की, नगरपालिका निवडणुकांसाठी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार भाजपा पक्ष संघटनेने एक महिन्यापूर्वीच दिला होता; मात्र शिवसेनेने युतीचा निर्णय हा राज्यस्तरावरच होईल, असे जाहीर केले. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तसे विधान होते, त्यामुळे राज्य स्तरावर युती जाहीर करण्यास शिवसेनेने वेळ घेतला व अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाला झुलवत ठेवले. तोपर्यंत भाजपाने स्वबळावर तयारी पूर्ण केली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हास्तरावर युती होऊ शकली नाही, हे वास्तव आहे व त्याला केवळ शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना यशोगाथेपासून दूरच !
युती सरकारच्या यशाची गाथा मांडतांना कृषी मंत्री फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र सरकार, भाजपा सरकार असा शब्दप्रयोग सातत्याने केला. त्यांच्या संपूर्ण निवेदनामध्ये कुठेही शिवसेनेचा उल्लेख आला नाही, त्यामुळे सरकार जरी महायुतीचे असले, तरी उदोउदो केवळ भाजपाचाच झाला. विशेष म्हणजे सोमवारच्या पत्रकार परिषदेला भाजपाच्या सर्व आमदारांसह, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांसह, महापौर व इतर पदाधिकारी प्रामख्याने उपस्थित होते; मात्र शिवसेनेच्या एका पदाधिकार्याला पत्रकार परिषदेचे आमंत्रणही नव्हते. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री अकोल्यामध्ये सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले होते, तेव्हाही शिवसेनेचा एकही पदाधिकारी कार्यक्रम स्थळी नव्हता, त्यामुळे कौतुक सरकारचे असले, तरी शिवसेनेला त्यामध्ये कुठेही स्थान नव्हते.
आणखी 'वाघ' कमी होतील!
भाजपाच्या कार्यकाळात विविध विभागांचा आढावा सादर करताना कृषी मंत्री फुंडकर यांनी विकासात कशी वाढ झाली, हे चित्र आकडेवारीसह मांडले. वन विभागाचा लेखाजोखा मांडताना व्याघ्र संवर्धनासाठी भरीव उपाय केल्यामुळे वाघांची संख्या १0३ वरून १९0 वर गेल्याचे ते म्हणाले. यावर, तुमचा मित्रपक्ष असलेल्या वाघाच्या संख्येचे काय, असा प्रतिप्रश्न उपस्थित केल्यावर 'ते वाघ' आणखी कमी होतील, असा टोला त्यांनी लगावला.