Kishori Pednekar: “बाबरी पडल्यावर भाजपला पळता भुई थोडी झाली होती, बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 04:07 PM2022-05-02T16:07:27+5:302022-05-02T16:09:58+5:30
Kishori Pednekar: देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे नाकारत नाही, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाराष्ट्र दिनी सभांचा धडाका पाहायला मिळाला. औरंगाबादमध्ये मनसे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुंबईत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभा झाल्या. या दोन्ही नेत्यांच्या सभांनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेत पलटवार केला. यातच शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. बाबरी पडल्यावर भाजपला पळता भुई थोडी झाली होती. पण तेव्हा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बुस्टर सभेत बाबरी पतनावेळी त्याठिकाणी हजर होते, असा दावा केला होता. मात्र, त्याठिकाणी एकही शिवसैनिक नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले होते. या वक्तव्याचा किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला. बाबरीचा घुमट पडल्यानंतर सगळ्यांची पळता भुई थोडी झाली होती. कोणीही बाबरी पतनाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.
देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते
शिवसैनिक बाबरी पतनाच्या वेळेस त्याठिकाणी होते की नाही, हे तपासण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व रेकॉर्ड तपासावेत. मी स्वत: २७ महिलांसह अयोध्येला जाण्यासाठी कल्याणमध्ये गाडीत बसले होते. मात्र, महिलांना यायचे नाही, असे सांगत आम्हाला गाडीतून उतरवण्यात आले. त्यामुळे बाबरी पतनावेळी अयोध्येला गेले होते, असे खोटे सांगणार नाही. देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे मी नाकारत नाही. पण त्यांच्यासोबत शिवसैनिकही तुरुंगात होते, ही बाब त्यांनी स्वीकारली पाहिजे. फडणवीस वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे राजकीय कार्य चांगले आहे. पण खोटे बोलून ते स्वत:ची प्रतिमा मलीन करत आहेत, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे. राज ठाकरे यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशामुळे तरुण मनसैनिक तुरुंगात जाऊन बसतील. तुम्ही तुमचे रेकॉर्ड बिघडवाल. मात्र, राज ठाकरे हे सगळे तुम्हीच भोगा, असे म्हणतील. पण मनसैनिकही हुशार झाले आहेत. हे सगळे खरे नाही. हे त्यांनाही माहिती आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.