“पक्षप्रमुख आदेश देतील, पण ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा”; सेना नेत्याचा राज ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:56 PM2022-04-19T22:56:15+5:302022-04-19T22:57:39+5:30
कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असून, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असे शिवसेना नेत्याने म्हटले आहे.
औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटमही दिले आहे. यावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना नेत्याने यावर भाष्य करत, पक्षप्रमुख जे आदेश देतील त्यानुसार जे काही उत्तर द्यायचे असेल, ते उत्तर देण्यात येईल. तसेच 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत संभाजीनगर येथे १ मे रोजी जाहीर सभा घेणार असून, ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले. मात्र, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करण्यात येत आहे. राज ठाकरेंची मशिदींवरील भोंग्यांची भूमिका, अयोध्या दौरा, तिसरी जाहीर सभा आणि सुरक्षा यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावर आपले मत मांडले आहे. औरंगाबाद येथील सिंचन भवनाच्या बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्यानुसार पक्षप्रमुख आदेश देतील
राज ठाकरे स्थिर नाहीत. त्यांच्यात जी राजकीय अस्थिरता आली आहे, त्याला नवसंजीवनी देण्याचा ते प्रयत्न करत असून, आधी शरद पवारांसोबत गेले, त्यानंतर भाजपवर हल्ला केला, आता मशीद आणि मंदिराचा विषय काढून राजकीय स्पीकर वाजवून मशीदवरील भोंगे बंद करा, असा नवीन पॅटर्न आणून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि पक्षप्रमुख जे काही आदेश देतील, त्याप्रमाणे 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेंगा', असा अप्रत्यक्ष इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी ३ मेचे अल्टिमेटम दिले आहे, यावर बोलताना, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सर्व मिळून निर्णय घेतील. त्यानुसार नियमावली तयार करण्यात येईल आणि त्या नियमांप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असा विश्वास असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.