"सुरूवात तुमची असली, तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते हे विसरलात का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:47 PM2022-05-26T13:47:11+5:302022-05-26T14:15:59+5:30
अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरुन दीपाली सय्यद यांचा निशाणा
शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकऱणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत ईडीनं शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेही टाकले आहेत. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
“सत्ता मिळत नाही मग घरगडी कामाला लावला का? तुमचा पहाटेचा टाईम फ्लॅाप होतो हे विसरले का? मिरा भाईंदरच्या फरार आमदाराकडे करोडो सापडले तिथली वाट ED विसरले का? सुरुवात तुमची जरी असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते हे विसरलात का?,” असे सवाल दीपाली सय्यद यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या कारवाईवर निशाणा साधला.
सत्ता मिळत नाही मग घरगडी कामाला लावला का? तुमचा पहाटेचा टाईम फ्लॅाप होतो हे विसरले का? मिरा भाईंदरच्या फरार आमदाराकडे करोडो सापडले तिथली वाट ED विसरले का? सुरवात तुमची जरी असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते हे विसरलात का? @ShivSena@advanilparab@bjpsamvad
— Deepali Sayed (@deepalisayed) May 26, 2022
भाजपचा परबांवर निशाणा
या प्रकरणी भाजपाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनिल परबांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. २५ कोटीचे रिसोर्ट बांधले. त्या बांधकामाचा खर्च कोणी केला? सचिन वाझेकडून १०० कोटी वसूली येत होती. त्यातही अनिल परब यांचे नाव होते. उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या नावानं बोगस एफआयआर करण्यात आला. पोलिसांना कुणाचा फोन येत होता? अनिल परबांनी बॅग भरायला घ्यावी. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे राइट हँण्ड आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.