खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 05:32 PM2023-02-07T17:32:35+5:302023-02-07T17:33:17+5:30
पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा दिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढला.
नाशिक - माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. आशीर्वाद तुम्ही मला द्या. गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल, या खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे असा घणाघात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांशी जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो भी जायेगा. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा दिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात. दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले; पण राजकीय अस्थिरत्यामुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार
नाशिकच्या सभेत बोलताना शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीत होत असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभेवरून जोरदार हल्ला चढवला. वरळीत त्यांना गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे, तरी विजय आपलाच होणार आहे. कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी पाठीवर वार करुन मला विरोधी पक्षात बसवलं. वरळीतून लढणं जमत नव्हतं तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
आदित्य ठाकरेंच्या विधानाला महत्त्व देऊ नका
आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, वरळी हा त्यांचा मतदारसंघ नाही. सचिन अहिर, सुनील शिंदे यांच्या छाताडावर पाय ठेऊन ते पहिली पायरी चढलेत हे ते विसरलेत. म्हणून त्यांच्या आव्हानाला महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणात एक निवडणूक जिंकली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असे त्यांना वाटते. आम्ही अनेक निवडणुका जिंकल्यात तरी आमच्यात हा अहंकार आला नाही असं त्यांनी सांगितले.