शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; "राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:35 PM2024-08-06T19:35:21+5:302024-08-06T19:40:31+5:30
शिवसेना नेते आनंदराव अडसूळ राज्यपाल पद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. भाजपानं दिलेला शब्द पूर्ण केला नाही असा आरोप त्यांनी केला.
अमरावती - राज्यपाल पदासाठी पुढील ८ दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणांचं जातवैधता प्रमाणपत्राचं प्रकरण पुन्हा बाहेर काढणार असा धमकीवजा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला आहे. नवनीत राणांच्या जातवैधता खटल्याबाबत पुर्नविचार याचिका करणार असल्याचेही अडसूळांनी सांगितले. अडसूळ यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपा यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, नवनीत राणांविरोधात घटनेच्या माध्यमातून जी कायदेशीर प्रक्रिया करायची ती आम्ही करत होतो. मात्र अमित शाह यांनी तुम्हाला राज्यपाल बनवणार आहोत, अमरावतीची जागा आम्हाला सोडा असा शब्द मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर दिला होता. या अपेक्षेने आम्ही थांबलो होतो. आदर म्हणून तिघांच्या उपस्थितीत आम्ही होकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने माझ्या नावाची राज्यपालपदाची शिफारस तात्काळ गृह मंत्रालयाकडे पाठवली. आम्ही विश्वास ठेवला, निवडणुका झाल्या, त्यांची सत्ता आली त्यामुळे दिलेला शब्द पाळणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु आता जी एक यादी निघाली त्यात नाव नाही तरी मी संयम ठेवला. २ दिवसांनी जाऊन भेटलो. त्यांनी थोडं थांबावे लागेल असं त्यांनी सांगितलं असल्याचं अडसूळांनी म्हटलं.
तसेच जेव्हा भाजपासोबत सरकार बनवण्याचं सुरू होतं तेव्हा केंद्रात २ मंत्रिपदे आणि २ राज्यपाल पदे देऊ असा शब्द देण्यात आला होता. निवडणूक झाल्यावर तो शब्दही भाजपाने पाळला नाही. स्वतंत्र्य कारभार असलेले एकच मंत्रिपद शिवसेनेला दिले. राज्यपालांच्या आश्वासनाबद्दल आम्ही थांबलो होतो. मी संयम ठेवला आहे अजूनही ८-१० दिवस वाट पाहणार त्यानंतर सुप्रीम कोर्टात नवनीत राणांबाबत जो निकाल दिला त्यावर फेरविचार याचिका दाखल करणार आहे. २० महिन्यापूर्वी दिलेला शब्द पाळायला हवा होता मात्र अजूनही पूर्ण केला नाही असं आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.
दरम्यान, अमित शाहांनी शब्द दिला, त्यामुळे अमरावतीतून माघार घेतली. जर मी निवडणूक लढवली असती तर चांगल्या मताधिक्याने निवडून आलो असतो आणि आज कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असते. माझ्या पक्षात मीच ज्येष्ठ आहे. ५ वेळा खासदार राहिलो, संसदरत्न मिळाला आहे. अटलबिहारी वाजपेयी काळात केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून कामही केले आहे. त्यामुळे मी लढलो असतो तर जिंकून मंत्रिपद मिळाले असते. मात्र भाजपाला जागा सोडल्यामुळे माझ्या हातून खासदारकी, मंत्रिपद सगळेच गेले आणि हाती अजूनही काही मिळाले नाही अशी खंत आनंदराव अडसूळ यांनी बोलून दाखवली.
रवी राणांनी अडसूळांना फटकारलं
आनंदराव अडसूळ जी वक्तव्ये करतायेत त्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेले दिसते. वयाप्रमाणे त्यांना आराम करण्याची गरज आहे. आजही ते जसं आम्हाला ब्लॅकमेल करत होते तसं देशाच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन ब्लॅकमेल करतायेत. नवनीत राणांविरोधात अडसूळांनी काम केले. अमरावतीत येऊन नवनीत राणांना पाडण्यासाठी यंत्रणा लावली. नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द त्यांनी अमित शाहांना दिला होता. मात्र त्यांनी नवनीत राणांना पाडण्याचं काम केले. राज्यपाल बनवणे अशी विधाने करून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत. त्यांना चांगल्या डॉक्टरकडे उपचाराची गरज आहे. त्यासाठी जो काही खर्च लागेल तो करण्यास मी तयार आहे असं खोचक पलटवार करत रवी राणांनी आनंदराव अडसूळांना फटकारलं आहे.