काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:32 PM2024-11-30T12:32:38+5:302024-11-30T13:13:21+5:30
एकनाथ शिंदे हे अचानक दरे या मूळ गावी गेल्याने नाराजीच्या चर्चांना आणखीनच बळ मिळाले.
Shiv Sena Sanjay Shirsat ( Marathi News ) : मुख्यमंत्रिपद नाकारण्यात आल्याने आणि नंतर गृहमंत्रिपदाच्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच शिंदे हे अचानक दरे या मूळ गावी गेल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केला असून आमची नाराजी नाही आणि नाराजी असेल तर ती आम्ही उघडपणे बोलून दाखवू, असं म्हटलं आहे.
"एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यायचा असल्याने ते त्यांच्या दरे या गावी गेले आहेत, यामध्ये तथ्य नाही. त्यांनी दिलेरपणाने आणि आत्मविश्वासाने सत्ता सोडली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. पण आम्ही लाचारासारखे नाटक करणारे लोक नाहीत. पोटात एक आणि ओठांत एक, अशी आमची औलाद नाही. आमच्या जे चेहऱ्यावर असतं, तेच आमच्या मनात असतं आणि नाराजी जरी असली तरी ती आम्ही उघडपणे जाहीर करू," असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, महायुतीत जास्त जागा निवडून आल्याने मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाण्याचे जवळपास निश्चित आहे. शिंदेसेना आणि अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडलेले शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. गृहखात्यावरही शिंदे यांनी दावा सांगितला असून त्याचा पेचही सुटला नसल्याचे सांगितले जात आहे.
हेलिकॉप्टरमधून उतरून तडक घराकडे रवाना
शुक्रवारी दरे गावात दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी न बोलता एकनाथ शिंदे थेट घरी गेले. यामुळे शिंदे यांच्या मनात चाललंय तरी काय, याची उत्सुकता वाढली आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळी अडचणीत अथवा द्विधा मनःस्थितीत असतात त्यावेळी ते दरे गावी येत असतात. दरे हे गाव दुर्गम असून येथे हेलिकॉप्टरने आल्यानंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधी व अथवा इतर कोणाशीही संभाषण न करता ते तडक आपल्या घराकडे रवाना झाले.