महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेऊन काम करते ; शिवसेनेचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 11:35 AM2020-01-28T11:35:17+5:302020-01-28T11:35:25+5:30
शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप सुद्धा यावेळी परब यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनातून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांनी केलेल्या या टीकेला शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. शिवसनेने कधीच आपला भगवा झेंडा बदलला नसून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रमाणे सुपारी घेऊन काम करत नसल्याचा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. एका न्यूज वेबपोर्टल दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.
मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, “मी रंग ही बदलला नाही आणि अंतरंग सुद्धा बदलला नाही”, हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले. तर यावेळी त्यांनी मनसेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेला बदनाम करण्याचे कंत्राट मनसे नेत्यांनी अनेकदा घेतेला असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.
राज ठाकरे यांनी सुरवातीला सर्व धर्माचें रंग असलेला झेंडा निवडला. मात्र तरीही लोकं आपल्याला मतदान करत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसची सुपारी घेतली होती. तर आता पुन्हा शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप सुद्धा यावेळी परब यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
राज ठाकरे यांनी लोकांच्या सुपारी घेऊन काम करण्यापेक्षा कधीतरी स्वता: साठी काम करावे. शिवसेनेने आजपर्यंत जे कामे केलीत ती ठोकून आणि दिवसा ढवळ्या केली आहेत. लपून-छुपून आम्ही कधीच कोणतेही कामे करत नसल्याचे परब म्हणाले. काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत सुद्धा आम्ही आघाडी सर्वांच्या समोर केली, लपून-छुपून केली नसल्याचे ते म्हणाले.
शिवसेना कधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रमाणे सुपारी घेऊन कामे करत नाही. तर शिवसेनेने आजपर्यंत कधीच झेंडा बदलला नसून, भविष्यात सुद्धा कधी बदलणार नाही. आमचा झेंडा भगवा असून पुढेही तो भगवाच राहणार असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी राज ठाकरेंना लगावला.