अर्जुन खोतकरांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:35 AM2022-07-30T11:35:54+5:302022-07-30T15:32:12+5:30
१९८९-९० मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली असं खोतकर म्हणाले.
जालना - माझ्याबद्दल काही तपास सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझ्या मतदारसंघातील कामे प्रलंबित आहे. अडचणीत असलेला माणूस आधार शोधतो. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यानंतर अडचण असेल तर तू निर्णय घेऊ शकतोस असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पाठिंबा देत असल्याचं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले.
अर्जुन खोतकर म्हणाले की, माझं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणं झाले. माझी जी परिस्थिती आहे त्यांच्या कानावर सगळं घातलं आहे. जिल्ह्यातील नेत्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. ४० वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. परंतु काही निर्णय घेणे अपेक्षित होते. याबाबत पक्षप्रमुखांना मी कळवलं. मी सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिस्थितीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय. मी पक्षप्रमुखांच्या कानावर या गोष्टी घातल्या आहेत. त्यामुळे त्यांचेही समाधान झाले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच १९८९-९० मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली. यामध्ये मी एकटाच नाही तर सर्व सहकारी या सर्वांनी मिळून जालना जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढवलं. सामान्य माणसांपर्यंत घेऊन गेलो आणि सामान्य माणसानेही तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यात लोकांनी आमच्या पदरात यश टाकलं. त्याबद्दल मी लोकांचे आभारी आहे असं अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षनेतृत्वाचेही मी आभार मानतो त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि मी समर्थपणे सांभाळली. मुळात हे प्रकरण जालना सुगर फॅक्टरी २०१२ कापडियांनी ४२ कोटींना विकत घेतली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी त्यांना विकत घेण्याची विनंती केली. विहित मुदतीत कापडियांना पैसे भरणं शक्य झालं नाही. तेव्हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अजित सिंग यांनी ४४ कोटींना घेतले. माझे आणि कुटुंबाचे ७ कोटी या कारखान्यात गुंतवणूक केली. ५ कोटी देवगिरी बँकेकडून कर्ज घेतले. ते आजही भरले नाही. ६० लाख माझ्या नावावर भरले आहेत. ३५ लाख भाऊ चक्रधर खोतकर आणि इतर भावांनी मदत करून ७ कोटी गुंतवले. आम्ही IMA साठी अर्ज केला. कारखाना सुरू करण्यासाठी ते गरजेचे लागते. या आर्थिक व्यवहाराबाबत न्यायप्रविष्ट बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो तेव्हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मी कारखाना सुरू करण्यासाठी मदत करायला तयार आहे असं आश्वस्त केले. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. रस्त्याचा प्रश्न, गौतमबुद्ध विहारचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असंही खोतकरांनी स्पष्ट केले.