"भाजप ज्या शिडीवरून वर चढते त्यालाच लाथ मारते," अरविंद सावंतांचा यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 03:17 PM2022-08-10T15:17:55+5:302022-08-10T15:18:01+5:30
महाराष्ट्रात ठेच लागली, तिकडे नितीश कुमार शहाणे झाले, सावंत यांचं वक्तव्य
बिहारच्या राजकारणात मंगळवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. दिवसभराच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर भाजपवर गंभीर आरोप केले. यावर भाजपचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य सुशील कुमार मोदी यांनी उत्तर देत भाजप जदयूला तोडू इच्छित होतं हे खोटं आहे. भाजप २०२४ मध्ये प्रचंड बहुमतानं निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भाजपनं इंग्रजांचं धोरण अवलंबलेलं आहे. ज्या शिडीवरून वर चढतात त्यालाच लाथ मारणं ही त्यांची कार्यपद्धती आहे. तसाच तिकडे नितीश कुमारांचा छळवाद होत होता, जसा आमचा इथे होत होता, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात ठेच लागली तिकडे नितीश कुमार शहाणे झाले, असंही सावंत म्हणाले.
“धोका देण्याचा पायंडा, ज्यांच्यात तो दुर्गुण आहे, तो भारतीय जनता पार्टीत किती मजबूतीनं आहे याची उदाहरणं काश्मीरपासून हरयाणापर्यंत, नितीश कुमारांपर्यंत सर्वत्र मिळतील. पाठीत सुरा खुपसण्यात कोण माहिर आहे? महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं काय झालं, घात कोणी केला. हे मोदी वगैरे काल जन्मालाआले आहेत. त्यांना महाराष्ट्राविषयी काय माहित आहे,” असा सवालही अरविंद सावंत यांनी केला. मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत जाताना कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला? हिंदुत्वाच्या, कलम ३७० च्या की काश्मीरमधील हिंदू बांधवांच्या? असं त्यांनी नमूद केलं.
महाराष्ट्रात काय झालं?
“महाराष्ट्रात युती झाल्यानंतरही पाडण्याचे प्रयत्न केले म्हणूनच आम्ही ५६ वर आलो. शब्द न पाळणारे तुम्ही का आम्ही? २०१४ ला विधानसभेत भाजपनं युती तोडली. काही कारण होतं का? सत्तापिपासूपणा, आमचं काम झालं. तेव्हा राज्यात पंतप्रधानांपासून सर्व मंत्री ठिय्या देऊन बसले होते. तेव्हा कोणाचा पराभव करायचा होता. काँग्रेस लोकसभेत पराभूत झालीच होती, महाराष्ट्रात नेस्तनाभूत झाल्यात जमा होती, मग कोणासाठी इतक्या सभा घेतल्या? शिवसेनेच्या खच्चीकरणासाठी हे केलं,” असंही ते म्हणाले.
“परंतु २०१९ मध्ये उदारमनानं उद्धव ठाकरेंनी राग सोडून युती केली. तेव्हा शब्द दिला. तेव्हा तिकडे सुशील मोदी होते का? तो शब्द त्यांनी फरिवला. माझ्या मुख्यमंत्र्यांचा अडीच वर्षांनंतरचा राजीनामा आगाऊ देतो, असं ते म्हणाले होते. हा शब्द अमित शाहंनी दिला होता. राज्यात जेव्हा त्रांगडं निर्माण झालं तेव्हा ते इकडे का फिरकले नाही?,” असा सवालही सावंत यांनी केला.