VIDEO: "गद्दारांची गाडी फोडा, जिल्हाप्रमुखपद मिळवा"; हिंगोलीत शिवसेना नेत्याचं वादग्रस्त विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:02 PM2022-08-01T19:02:54+5:302022-08-01T19:05:57+5:30
राज्यात शिंदे गटातील आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
राज्यात शिंदे गटातील आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तसंच उद्धव ठाकरे देखील मुंबईत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्षाला बळकटी देण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेत्या नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच हिंगोलीतील शिवसेना नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. गद्दार आमदारांची जो कुणी पहिली गाडी फोडेल त्याला हिंगोलीचं शिवसेना जिल्हाप्रमुखपद दिलं जाईल असं विधान शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केलं आहे.
शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या गाड्या तुमच्या गावात येताच तुम्ही फोडा, तुमचा 'मातोश्री'वर सन्मान करण्यात येईल, असे बबन थोरात म्हणाले आहेत. आज हिंगोली शहरातील महावीर भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात थोरात यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे शिंदे गटात गेल्याने हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवा शिलेदार देणार आहेत. या पदासाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक जण इच्छुक आहेत आणि याच इच्छुकांना बबनराव थोरात यांनी आवाहन केलं आहे.
VIDEO: गद्दारांची गाडी फोडणाऱ्याला शिवसेनेचं जिल्हाप्रमुखपद आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते बहुमान केला जाईल; शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचं वादग्रस्त विधान. pic.twitter.com/CIUpQGiMtk
— Lokmat (@lokmat) August 1, 2022
नेमकं काय म्हणाले बबनराव थोरात?
"तुम्हाला आता गावागावामध्ये उभं राहावं लागेल. गद्दारांना विचारावं लागेल की ज्या देवमाणसामुळे तुम्ही आमदार, खासदार झालात. त्यांच्याच पाठित खंजीर खुपसला. तुम्हाला आता आम्ही गावात येऊ देणार नाही. जे जे जिल्हाप्रमुखपदासाठी इच्छुक आहेत. त्या सगळ्यांना माझं आवाहन आहे. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या गद्दारांच्या गाड्या येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या शुभहस्ते मातोश्रीवर केला जाईल. आता आपल्याला कामाला लागायचं आहे. भामट्यांना ठेचायचं आहे. यांना रोखायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचा जयजयकार करावा लागेल", असं बबनराव थोरात म्हणाले.