आदित्य ठाकरेंवरील टीका महागात; चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच अज्ञातवासात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 09:56 PM2020-03-13T21:56:37+5:302020-03-13T21:58:21+5:30
पक्षनेतृत्वाने समज दिल्याची चर्चा; विरोधात वक्तव्यामुळे पुढील संधीचे दोर कापण्याची चिन्हे
- विकास राऊत
औरंगाबाद : शहर व जिल्ह्याच्या राजकारणात ३२ वर्षांपासून सक्रिय असलेले शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे शुक्रवारी (दि.१३) पहिल्यांदाच फोन बंद करून अज्ञातवासात गेले. राज्यसभेवर जाण्याच्या अपेक्षेचा भंग झाल्यानंतर खैरे यांनी युवा सेनाप्रमुख तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरच गुरुवारी निशाणा साधला. त्या वक्तव्यामुळे पक्षातील त्यांचे पुढील संधीचे दोर कापले गेल्याची चर्चा सुरू झाली असून, पक्षनेतृत्वाने शुक्रवारी खैरेंना समज दिल्यानेच त्यांनी निकटवर्तीयांसह माध्यमांपासून दूर राहणे पसंत केल्याचे बोलेले जात आहे. राज्यसभा सदस्यत्वासाठी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आल्याने खैरेंच्या संयमाचा बांध फुटला. सोशल मीडियासह खैरे विरोधकांनी त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे. पक्षाने विविध पदांवर संधी देऊनही त्यांनी नाराजी व्यक्त करण्याची गरज नसल्याची चर्चा खैरे विरोधी गटात सुरू झाली आहे.
तीन दशकांच्या राजकारणात खैरेंनी कधीही स्वत:चा मोबाईल बंद केला नाही. त्यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच सकाळपासून दोन्ही फोन बंद केले. ते कुठे गेले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे रेल्वेस्टेशन परिसरात तिरुपती इन्क्लेव्हमध्ये निवासस्थान आहे, ते तिथेही नव्हते. एरव्ही वॉर्डातील किरकोळ कारणासाठी नागरिकांनी संपर्क केला तरी खैरे उपलब्ध होतात, अशी त्यांची ख्याती आहे; परंतु शुक्रवारी त्यांच्या समर्थकांना ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या स्वीय सहायकांना संपर्क करून विचारणा केली. त्यांनादेखील ते कुठे गेले याची माहिती नव्हती. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने खैरे यांच्या दोन्ही मोबाईलवर संपर्क केला, ते दोन्ही फोन बंद होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘बिझी’ असल्याचा एसएमएस टाकला. पुतणे सचिन खैरे यांना फोन केला असता ते म्हणाले, मी लोकेशन घेऊन सांगतो, असे बोलून फोन बंद केल्यानंतर त्यांनी पुन्हा फोनच घेतला नाही.
खैरेंना आतापर्यंत पक्षाकडून अनेकसंधी आणि पदं
१९८८ साली पहिल्या मनपा निवडणुकीत नगरसेवकपद, तसेच विरोधी पक्षनेतेपदही दिले. त्यानंतर १९९० व १९९५ साली विधानसभेची उमेदवारी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहनिर्माण व परिवहन या मंत्रीपदांवर संधी दिली. १९९९ पासून २०१९ पर्यंत चार वेळेस लोकसभेची उमेदवारी दिली. संघटनेत उपनेते, नेते ही पदे दिली, तसेच मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचे संपर्कनेतेपद दिले. २०१५ मध्ये चिरंजीवाला नगरसेवकपदाची संधी दिली. त्यानंतर पुतण्यालाही नगरसेवकपदासाठी उमेदवारी दिली.
संपर्कप्रमुख घोसाळकर म्हणतात...
शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, ते गुरुवारी माध्यमांशी काय बोलले, हे मला माहिती नाही. माझे आणि त्यांचे बोलणे अजूनपर्यंत झालेले नाही. ते जेव्हा माझ्याशी संपर्क करतील, त्यावेळी मला नेमके झाले ते समजेल. गुरुवार आणि शुक्रवारी दिवसभरात काय झाले ते तपासावे लागेल.