महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते' - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 10:06 AM2019-11-14T10:06:22+5:302019-11-14T10:11:53+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजप सारख्या बलाढ्य पक्षाची सत्ता राणेंच्या प्रवेशाने गेली.
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची मंगळवारी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. सत्ता येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करेन. तसेच शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उल्लू बनवत असल्याचे ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या टीकेला आता शिवसेनकडून उत्तर देण्यात आले आहे. राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते, असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊ शकेल असं वाटत नाही. शिवसेनेला आमदारांना डांबून ठेवावे लागेल. तसेच साम दाम दंड भेद हे शिवसेनेचंच आहे, असं जे बोलले ते हॉस्पिटलमध्ये आहेत. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उल्लू बनवत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. एवढी वर्षे राजकारण करतात, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.
तर राणेंना उत्तर देताना केसरकर म्हणाले, राणे जिथं जातात तिथे पराभव होत असतो. त्यांच्या एंट्रीने अनेक पक्ष संपले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी खूप वेळा सांगितले होते, की राणेंना पक्षात घेऊ नका. भाजप सारख्या बलाढ्य पक्षाची सत्ता राणेंच्या प्रवेशाने गेली. एवढच नाही तर फडणवीस यांचे काळजीवाहू मुख्यमंत्री पद सुद्धा गेले. असा टोला केसरकर यांनी राणेंना लगवाला.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य करू नये, असा सल्ला भाजप नेतृत्वाने राज्यातील सर्व नेत्यांना दिला आहे. तोडफोड करून भाजप राज्यात सरकार स्थापन करू पाहत आहे, असे संकेत जाऊ नयेत म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व नेत्यांना कोणतेही भाष्य न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नेत्यांमध्ये नारायण राणे यांचाही समावेश आहे.