Deepali Sayed On MNS : “… मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले,” दीपाली सय्यद यांचा मनसेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:56 PM2022-05-19T12:56:38+5:302022-05-19T13:08:07+5:30
Deepali Sayed On MNS : गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सातत्यानं मनसेवर निशाणा साधत आहेत.
Deepali Sayed On MNS : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) या मनसेवर (MNS) सातत्यानं निशाणा साधत आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत उत्तर प्रदेशची माफी मागावी आणि नंतरच अयोध्या दौरा करावा असं म्हटलं होतं. यानंतर दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत जावं, असा सल्ला दिला होता. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे.
“पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे. यापूर्वीही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, पण त्यांना तिथं येऊ दिलं जात नाही. मी राज ठाकरेंना एवढं सांगेन की, त्यांचं राजकारण हे केवळ २ तालुक्यापुरतंच आहे. पण, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा आहे. बाबरी मशिद पाडल्याची संपूर्ण जबाबदारी स्वर्गीय बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांचा ते वाक्यही आजही आपल्याला आठवतं,” असे म्हणत दीपाली सय्यद यांनी मनसेला खोचक टोला लगावला.
पावसाचे कारण देऊन मैदान सोडले
— Deepali Sayed (@deepalisayed) May 18, 2022
भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले
अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.@mnsadhikrut@ShivSena
पुण्यातील सभा पुढे ढकलली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली आहे. राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांना संबोधित करणार होते. परंतु पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचं पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले आहे. येत्या शनिवारी राज ठाकरेंची सभा मुठा नदी पात्रात होणार होती. शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आल्याचंही समजतंय.