आता शाळेतली मुलं, सर्वसामान्यही ५० खोके एकदम ओके म्हणायला लागलीयेत - भास्कर जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 04:08 PM2022-08-25T16:08:04+5:302022-08-25T16:10:56+5:30
शिंदे गटाच्या आमदरांच्या घोषणांना भास्कर जाधवांचं सडेतोड उत्तर.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर गुरुवारीही सत्ताधारी पक्षातील आमदार सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमा झाले आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकवण्यात आले. विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ५० खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” असे पोस्टर झळकवण्यात आले. यानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
“यांच्या हृदयावर ५० खोक्यांचा बाण बसला आहे याचंचं ते उदाहरण आहे. छोटी छोटी मुलं देखील, शाळेतील मुलं, सर्वसामान्य माणूसही ५० खोके एकदम ओके म्हणायला लागलाय. त्याच अस्वस्थतेतून त्यांनी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला काही यश मिळणार नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले. त्यांनी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार निशाणा साधला.
“आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रातून जो पाठिंबा मिळतोय, सर्व जातीधर्माची जनता त्यांच्या मागे उभी राहत आहे, यामुळे आमचे विरोधक नाराज झालेत. आदित्य ठाकरेंच्या रूपात नवा नेता शिवसेनेत पुढे येत आहे त्यांना मागे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यात ते यशस्वी होणार नाहीत,” असंही आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत असल्याच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.
आदित्य ठाकरे टार्गेट
शिंदे गटाच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला. "महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज...२०१४ ला १५१ चा हट्ट धरुन युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर. पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन...खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार...जनता हे खोटे अश्रू पूसणार नाही... तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही. युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली", अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला होता.