नाशिकच्या जागेसाठी ठाण्यात शक्तिप्रदर्शन; उमेदवारीसाठी आग्रह, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 01:03 PM2024-03-25T13:03:56+5:302024-03-25T13:05:41+5:30
Nashik Lok sabha Seat: नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना नेते आक्रमक आहेत. तर या जागेवर भाजपासह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे.
ठाणे - लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून करण्यात आलेला दावा आणि दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहावी यासाठी या गटाच्या वतीने रविवारी रात्री ठाणे येथे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे, यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गोडसे यांचे समर्थक असे सर्व जण सुमारे पन्नास ते साठ मोटारींमधून सायंकाळी ठाणे येथे गेले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ते भेट घेणार होते. रात्री आठ वाजेची वेळ मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. मात्र, त्यांना विलंब झाल्याने पुलाखालील उद्यानाच्या जवळ सर्वांनी तेथेच ठाण मांडले आणि शिवसेनेच्या घोषणा देतानाच नाशिकच्या जागेवर दावा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री आठ वाजता भेटीसाठी वेळ दिली असली तरी ते विलंबाने आल्याने कार्यकर्त्यांनी तेथेच ठाण मांडून त्यांना निवेदन दिले.
नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असून हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेत फाटाफुट झाल्यानंतर शिंदे गटात हेमंत गोडसेदेखील सहभागी झाले. दरम्यान, महायुतीत सहभागी झाल्यानंतर विद्यमान जागा शिंदे गटाकडे असल्याने सहजगत्या ही जागा आपल्याला मिळेल असा या पक्षाचा समज होता. मात्र, आता भाजपाने नाशिकच्या जागेवर दावा सांगितला आहे. ही जागा मिळावी यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील या जागेवर दावा सांगितला. सध्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू असताना अन्य मित्र पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असताना गोडसे यांच्यासह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांनी रविवारी रात्री आठ वाजता ठाण्याला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार सायंकाळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रवाना झाले होते.
भुजबळ यांच्या भेटीच्या चर्चेने शिंदे गट आक्रमक
भाजपाकडून नाशिकच्या जागेसाठी प्रयत्न सुरू असले तरी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यात नाशिकच्या जागेवर दावा सांगितला तसेच गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवल्याची चर्चा पसरली होती. त्यामुळे शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली. अर्थात, भुजबळ यांनी फक्त नाशिकची जागा मागितली असा दावा खुद्द खासदार हेमंत गोडसे यांनी लोकमतशी बोलताना केला आहे