तुम्हाला पोटशूळ येण्याचे कारण काय?; शिवसेनेचा संजय राऊतांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:05 PM2023-08-12T15:05:05+5:302023-08-12T15:05:37+5:30
नवाब मलिकांना जामीन दिल्यानंतर ते सोबत राहणार नाही अशी भीती संजय राऊतांना का वाटते? असंही पावसकर म्हणाले.
मुंबई – वर्षानुवर्ष कालनिर्णय कॅलेंडर लिहिलं जातं. अमावस्या कधी असेल, पोर्णिमा कधी असेल. सूर्यग्रहण वैगेरे ते सांगतात. परंतु संजय राऊतांकडे आता सध्या काही काम नाही त्यामुळे ते यावरही भाष्य करू लागलेत. सत्तेत आल्यावर चौकशा बंद होतात असं होत असते तर संजय राऊत यांच्यावर पत्राचाळीचा घोटाळा आहे. ते स्वत: सत्तेत आले असते आणि निरमा पावडरच्या बाटलीत उतरले असते. राऊत महान नेता नाही. स्वत:च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारे अशी त्यांची प्रवृत्ती आहे अशा शब्दात शिवसेना नेते किरण पावसकर यांनी राऊतांवर घणाघात केला आहे.
किरण पावसकर म्हणाले की, कुणी सत्तेत आले म्हणून कारवाई थांबली नाही, जनतेसमोर कायद्याच्या दृष्टीने जे काही समोर यायलं हवं ते सर्व येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यापासून सरकार कोसळणार, मंत्रिमंडळ विस्तार नाही, कुणी महिने देत होते. आज विस्तार होताना तुमच्यासोबत असलेला पक्षही सरकारसोबत आला. पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेऊन ते लोक येतायेत मग तुम्हाला पोटशूळ येण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच नवाब मलिकांना जामीन दिल्यानंतर ते सोबत राहणार नाही अशी भीती संजय राऊतांना का वाटते? मेडिकल रिपोर्ट पाहून त्यांना जामीन दिलाय. कायद्याच्या दृष्टीने ज्या बाबी आहेत ते तपासून कोर्टाने निर्णय घेतला आहे. कोर्टावर तरी विश्वास ठेवा. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेच सगळे ठरवणार का? नवाब मलिक त्यांच्या मंत्रिमंडळात होते. मग इतक्या वर्षांनी ते जेलबाहेर आले त्याचा आनंद का होत नाही असंही पावसकरांनी राऊतांना टोला लगावला.
दरम्यान, अजितदादांच्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर असल्याने कौटुंबिक कार्यक्रमामुळे ते पुण्यातील कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. कधीतरी मुख्यमंत्र्यांना विश्रांती देणार की नाही. रात्रंदिवस ते जनतेसाठी काम करत असतात. त्यांनाही वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहायचं होतं म्हणून ते पुण्यातील कार्यक्रमाला आले नाहीत असं शिवसेना नेते किरण पावसकर यांनी सांगितले.