"झेड सुरक्षा मिळाल्यापासून धाडस वाढलंय, तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊनच दाखवा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 04:51 PM2022-04-15T16:51:48+5:302022-04-15T16:52:04+5:30
किरोशी पेडणेकर आ. रवी राणांवर भडकल्या. रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसाचं पठण करण्याचं केलं आवाहन.
आ. रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसाचं पठण करण्याचं आवाहन केलं. यानंतर रवि राणा आणि शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. "असल्या आवाहनांना आम्ही विचारत नाही. उद्धव ठाकरेंनी काय वाचावं, काय करावं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही आमदार आहात, तुम्ही तुमचं काम करा," असं म्हणत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.
"त्यांना झेड सुरक्षा मिळाल्यापासून ते जास्तच बोलायला लागले आहेत. तुम्ही कोणाच्याही मंदिरात घुसून हनुमान चालीसा बोलणार का? तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या मंदिरात करा कोणी अडवलं आहे. आम्ही दरवर्षी वाचतो, सामूदायिक पठण असतं, हे आता धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी किंवा महाराष्ट्रात दंगल करण्यासाठी नाही. ज्या पद्धतीनं तुम्हाला लगेच साठ सत्तर लाखाची सिक्युरिटी मिळाल्यावर अधिकच धाडस वाढत चाललंय. थेट मातोश्रीत घुसून... हा जरा जास्तच आवाज होतोय," असंही त्या म्हणाल्या. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी संताप व्यक्त केला.
जर राज्याच्या मुख्यमंत्री हनुमान चालीसा वाचत नसतील तर आम्ही मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा वाचू. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचू नये हे कुठे लिहून ठेवलंय का? असा सवाल रवी राणा यांनी यावेळी केला. यानंतर तुम्ही मातोश्रीवर येऊनच दाखवा असा इशाराही किरोशी पेडणेकर यांनी रवी राणांना दिला. यावेळी महागाईची हनुमान चालीसा, दरोडेखोरांची हनुमान चालीसा, पेट्रोल डिझेल महागलंय ती हनुमान चालीसा आपण वाचणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आम्ही काळाला आणि वेळेला मानतो. या दोन्हीचा मेळ घालून त्यांनी जे काम केलंय त्यामुळे देशात अव्वल नंबरमध्ये ते आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.