"राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल"; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 03:09 PM2023-03-06T15:09:51+5:302023-03-06T15:10:41+5:30
सहानुभूती निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत. खरेतर कोकणात जाताना त्यांनी आधी विचार करायला हवा होता अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.
मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतील खेडच्या सभेवरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंची सभा अतिविराट होती, लोकांचा प्रचंड प्रतिसाद उद्धव यांच्या सभेला मिळाला असा दावा ठाकरे गटाचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे ही गर्दी मुंबई, पुणे, ठाण्यावरून आणलेल्या लोकांची होती त्यात स्थानिक लोकं नव्हती असं रामदास कदमांनी म्हटलं. मात्र राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल असं विधान शिवसेना नेते मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, राज ठाकरे जर आले असते तर यापेक्षा दुप्पट गर्दी जमली असती. कारण कोकणातील गर्दी ही ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येते. ती बाळासाहेबांची पुण्याई आहे. ज्यावेळी तुम्ही स्वत: कोकणात गेला आणि नारायण राणेंचा पराभव करू शकला नाहीत. त्याठिकाणी तुमच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त केली गेली. त्यानंतर कोकण तुमच्या पाठिशी उभे राहिले याची जाणीव जरी तुम्ही ठेवली असती तर बरे झाले असते असं त्यांनी सांगितले.
तसेच सहानुभूती निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत. खरेतर कोकणात जाताना त्यांनी आधी विचार करायला हवा होता. अजित पवारांनी निर्दयीपणे कोकणातील पैसे काढून घेतले तेव्हा त्यांच्यासमोर बोलण्याची तुमची हिंमत झाली नाही. कोकणातील जिल्हा नियोजन समितीचे बजेट २५० कोटी होते ते अजित पवारांनी थेट १५० कोटींवर आणले. तेव्हा तुम्ही काय करू शकला नाही. कोकणातील लोकांवर अन्याय झाला तरी चालेल केवळ स्वत:ची खुर्ची सांभाळायची. ज्या योजनेची तुम्ही घोषणा केली होती. त्याला केवळ २५ कोटी दिले होते. मी तुम्हाला काय देऊ शकत नाही असं म्हणण्यापेक्षा जेव्हा तुमच्या हातात होते त्यावेळी तुम्ही कोकणाला का दिले नाही? असा सवालही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
दरम्यान, ज्या राहुल गांधींनी वीर सावरकरांना अनिष्ट बोलले त्यांच्या मागे तुम्ही फरफटत जात आहात. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांचे नाव काढून टाका. आम्ही शिवसेनेत राहण्यासाठी आमदारकी पणाला लावली. आम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं होते तर आम्हाला कुठलाही धोका नव्हता. आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत होते असा टोलाही केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.