बाळासाहेबांचा मुलगा म्हणवता, हिंमत असेल तर...; शिवसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:49 AM2023-03-30T10:49:27+5:302023-03-30T10:49:52+5:30
बाळासाहेब स्वत: रस्त्यावर उतरले आणि जोडे मारले. केवळ सभेत घोषणा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नका असा टोला शिवसेना नेते नरेश म्हस्केंनी लगावला.
ठाणे - लाचारांचा नाही, इथं विचारांचा मान, भगवे आमचे रक्त अन् प्राण आमुचे श्री राम....अशा शब्दात शिवसेनेने शहरात बॅनर लावून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही जणांनी मतांसाठी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडले. खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडीला लावून बसले. केवळ बेगडी हिंदुत्व दाखवू नका. कृतीत हिंदुत्व आणा. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बाण मारला आहे असा टोला शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, केवळ खुर्चीसाठी ज्या राहुल गांधींनी देशात-परदेशात सावरकरांविरोधात वक्तव्ये केली. सावरकरांचा अपमान केला. त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून खुर्चीसाठी उद्धव ठाकरे बसलेत. सावरकरांविरोधात मणिशंकर अय्यर यांनी विधान केले तेव्हा बाळासाहेब स्वत: रस्त्यावर उतरले आणि जोडे मारले. केवळ सभेत घोषणा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नका. हिंमत असेल तर रस्त्यावर या आणि राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारा. नुसते बेगडी हिंदुत्व स्वीकारले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधींना माफी मागायला सांगा, नाहीतर आघाडी तोडा. बाळासाहेबांचा मुलगा म्हणवता, वारसा सांगता तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींना माफी मागायला सांगा तरच तुम्ही बाळासाहेबांचा सुपुत्र शोभणार आहे असं आव्हानही शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
सावरकर वादावरून काँग्रेस-ठाकरे गटात तडजोड
सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींविरोधात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत थेट टीका केली. सावरकर हे आमचे दैवत असून त्यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांशी संवाद साधला. ठाकरेंच्या या मागणीशी राहुल गांधी सहमत दिसले आणि महाराष्ट्र आणि संसदेची लढाई एकत्र लढायची असेल तर दोन्ही पक्षांना एकमेकांच्या विचारसरणीचा आदर करावा लागेल, अशी सहमती दोन्ही पक्षांमध्ये झाली. मात्र भाजपा-शिवसेनेकडून राज्यात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.