उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 08:46 AM2024-09-08T08:46:31+5:302024-09-08T08:49:42+5:30

भगव्या झेंड्याला अधिक तेज कसं येईल त्यासाठी प्रयत्न करणार पण बाळासाहेबांचा भगवा झेंडा आम्ही सोडणार नाही जो उद्धव ठाकरेंनी सोडलाय असंही रामदास कदमांनी सांगितले.

Shiv Sena leader Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल

रत्नागिरी - उद्धव  ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे दिसतात तेवढेच ते प्रचंड लबाड आहेत. काँग्रेसच्या नादाला लागून आणि शिवसेनाप्रमुख्यांच्या विचारांविरोधात जाऊन काय होते याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत्या विधानसभेला कळेल अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदमांनीउद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

माध्यमांना मुलाखत देताना रामदास कदम म्हणाले की, २००९ मध्ये मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. विरोधी पक्षनेता म्हणून कदाचित बाळासाहेब ठाकरे माझे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करतील त्यामुळे मला गुहागरमध्ये पाडण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनीच केले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. संधी मिळूनही अडीच वर्ष कूचकामी ठरले. जनतेच्या भल्यासाठी त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही तर त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. अडीच वर्षात २ दिवसही मंत्रालयात गेले नाहीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करणं किती चुकीचे आहे हे महाराष्ट्र पाहतोय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची घाई लागली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच अमित शाह जर भिंतीच्या आड मुख्यमंत्रिपदाबाबत बोलले असतील तर तुम्ही त्यावर बाहेर पत्रकार परिषदेत का सांगितले नाही. तुमच्यासमोर अमित शाह सांगतायेत पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मग तुम्ही त्यांना का थांबवलं नाही? फक्त मुख्यमंत्री बनणं एवढीच राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे यापलीकडे त्यांच्याकडे महाराष्ट्र हिताच्या अशा कुठल्याही बाबी नाहीत. मी त्यांना जवळून अनुभवलं आहे. उद्धव  ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे दिसतात तेवढेच ते प्रचंड लबाड आहेत. उद्धव ठाकरेंना अद्याप शरद पवार कळले नाहीत. भलेभले थकले, शरद पवार काय हे लवकरच उद्धव ठाकरेंना समजेल. काँग्रेसच्या नादाला लागून आणि शिवसेनाप्रमुख्यांच्या विचारांविरोधात जाऊन काय होते याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत्या विधानसभेला कळेल असा टोला रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, राजकारणात गेल्यानंतर नात्यात १०० टक्के वैमनस्यच आणायचे हे चुकीचे आहे. नातीगोती सांभाळूनही राजकारण होऊ शकते, हा महाराष्ट्र आहे बिहार नाही. अजित पवारांनी केलेले विधान चांगलेच आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेससोबत आहेत तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही हे मी आधीच सांगितले होते आता पुलाखाली एवढे पाणी गेलंय त्यामुळे दोन शिवसेना एकत्र येणं अशक्य आहे. आमची बांधिलकी बाळासाहेब ठाकरेंची होती, उद्धव ठाकरेंची नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेण्याचं काम काँग्रेससोबत जात उद्धव ठाकरेंनी केले त्यामुळे त्यांनी नाते तोडले. दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या पायाशी बसायचं, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती द्यायची त्यामुळे आमचे त्यांचे नाते शिल्लक नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुखांचा भगवा झेंडा प्यारा, भगव्या झेंड्याला अधिक तेज कसं येईल त्यासाठी प्रयत्न करणार पण बाळासाहेबांचा भगवा झेंडा आम्ही सोडणार नाही जो उद्धव ठाकरेंनी सोडलाय असंही रामदास कदमांनी सांगितले. 

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अशा योजना केवळ महाराष्ट्रात नाहीत, कर्नाटक आणि इतर राज्यातही आहेत, मग त्यांनीही पैशांची उधळण केली का? लोकसभेत मिळालेले यश त्यांना पचवता येत नाही. आमच्या सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतल्या आमच्या माता भगिनी महिला खुश आहेत. जनतेचं सरकार आहे. शेवटच्या घटकापर्यंत पोहचतंय, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. उद्या आमचं काही विधानसभेत खरं नाही या भावनेतून विरोधकांकडून टीका केली जातेय असं कदमांनी म्हटलं. 

कोकणवासियांची माफी 

मुंबई-गोवा महामार्गावरील दुरावस्थेमुळे कोकण चाकरमान्यांना २० तास प्रवासात रखडावे लागले त्याबद्दल मला खेद आहे. मी सर्व कोकणवासियांची माफी मागतो. आमचं सरकार आहे, आमच्याकडून हे होऊ शकले नाही. खेडला यायला २०-२५ तास लागतात. पुढच्या गणपती उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार वैयक्तिक लक्ष घालतील, समृद्धी महामार्गासारखा हा महामार्ग व्हावा ही इच्छा आहे असं रामदास कदमांनी सांगितले. 

Web Title: Shiv Sena leader Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.