उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, माझ्या नादाला लागू नका; रामदास कदम संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 11:34 AM2023-03-06T11:34:21+5:302023-03-06T11:34:44+5:30
ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता. मात्र हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही अशी टीका रामदास कदमांनी केली.
खेड - बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही बेभान झाला. शिवसेना माझी प्रायव्हेट लि. कंपनी आहे असं वागले. मी म्हणेल तेच होईल. हुकुमशहा प्रवृत्तीसारखे उद्धव ठाकरे वागले. मला बदनाम करण्याचं राजकारण तुम्ही केले. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेते बाहेर. आम्हालाही बोलता येते. उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले आहेत, माझ्या नादाला लागू नका अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली आहे.
रामदास कदमांनी म्हटलं की, योगेश कदमांना संपवण्याचं कटकारस्थान उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना केले गेले. स्थानिक आमदार असताना पक्षातील नेत्यालाच संपवण्याचं काम तुम्ही केले. तुमच्या सगळ्यांना मी १९ तारखेला उत्तर देणार आहे. मागच्या निवडणुकीत मला पाडण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. गुहागरच्या राजकारणातून भास्कर जाधव तुला गाडला नाही तर बघ. मतदारसंघातील जनता तुलाच उत्तर देईल. रामदास कदमांवर बोलण्याची भास्कर जाधवची औकात आहे का? निवडणुकीत जाधवांना तिकीट देण्यास कुणी सांगितले होते. १९९५ साली मी बाळासाहेबांना सांगितले होते तेव्हा जाधवांना तिकीट मिळाले. जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून माझ्या पाया पडला होता अशी टीका त्यांनी केली.
त्याचसोबत आमदार, खासदार का जातात याचे आत्मचिंतन करत नाहीत. तुम्ही आमदारांना गेट आऊट करता. धनुष्यबाण आणणारच. महाराष्ट्राच्या विधानभवनावर बाळासाहेबांच्या विचारांचा आणि छत्रपतींचा भगवा झेंडा फडकवणारच. तुमचे वडील असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले असते का? राष्ट्रवादीला सोडा सगळे आमदार गुवाहाटीहून परतण्यास तयार होते. पण ते सोडवत नव्हते. अयोध्येला जाण्यासाठी उद्धव ठाकरे निघाले तेव्हा सगळी व्यवस्था मी केली. पण अयोध्येला जाताना मी येऊ नये अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली. शिवसेना भवनात उमेदवारांचे फोन यायचे तेव्हा रामदास कदमांची सभा हवी पण ते सोडून इतर मागा असं सांगितले जायचे. उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा आहे पण त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेत त्याचा मी साक्षीदार आहे. तुमची नसनस मी ओळखतो असा घणाघातही रामदास कदमांनी केला.
...मग राज ठाकरे तुमचे ड्रायव्हर झाले का?
विकासासाठी गेल्या अडीच वर्ष सरकारमध्ये शिवसेना आमदारांना निधी दिला का? अजितदादांनी राष्ट्रवादी आमदारांना सर्वाधिक निधी दिला. तुम्ही मुख्यमंत्री होता तुमच्या आमदारांना १६ टक्के दिले. लाज वाटते का? लोकांना भावनात्मक ब्लॅकमेल करतायेत. केशव भोसलेंच्या गाडीवर मी ड्रायव्हर होतो असं तुम्ही सभेत म्हणाला, मी ड्रायव्हर होतो हे सिद्ध करा मी तुमच्या घरी भांडी घासेन नाहीतर तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या. ज्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लिलावती हॉस्पिटलहून तुम्हाला गाडी चालवून घरी नेले होते. म्हणजे ते तुमचे ड्रायव्हर झाले का? संदीप देशपांडेवर हल्ला कुणी केला? असा सवालही कदमांनी विचारला.
बरबटलेल्या हातात धनुष्यबाण राहील का?
ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता. मात्र हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही. भांडुपचा आमदार अशोक पाटील यांनी जाहीर सभेत आमदारकीचा सौदा किती कोटीत झाला हे जाहीरपणे सांगितले होते. तिकीट देण्यासाठी, कापण्यासाठी तुम्ही पैसे घेत असाल तर अशा भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या हातात धनुष्यबाण राहील का? ज्याला कावीळ असेल त्याला जग पिवळे दिसते. सुरुवात तुमची, शेवट माझा.. मी बाहेर पडणार. अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भविष्यात द्यावी लागणार आहेत. माझ्या नादाला लागू नका. मी शांत बसलोय, मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या वडिलांच्या विचारांची बेईमानी तुम्हीच केले. त्या वडिलांचे नाव सांगण्याचा अधिकार तुम्हाला हवे की नाही याचे आत्मपरिक्षण करा. हे चोरलं, ते चोरलं मग तू काय करतोय? झोपलाय का? असंही रामदास कदम म्हणाले.