अचानक तुम्ही मला 'मातोश्री'मध्ये बोलावलं अन्...; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:49 PM2022-07-18T13:49:42+5:302022-07-18T13:50:57+5:30
शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं अशी खंत रामदास कदम यांनी व्यक्त केली.
मुंबई - शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडत असल्याचं चित्र निर्माण झाले. रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले. त्यानंतर आता रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
रामदास कदम यांनी राजीनामा मातोश्रीवर पाठवला. या राजीनामा पत्रात म्हटलंय की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतले आणि मला आदेश दिलेत की, यापुढे तुमच्यावरती कुणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले, मातोश्रीवर कुणी काही बोलले तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे असंही रामदास कदम म्हणाले.
दरम्यान, २०१९ मध्ये आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष केला. हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करू नका. ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल अशी आपल्याला विनंती केली. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे असं रामदास कदम यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे