होय, मी लस घेतली, हात दुखतोय म्हणून काळजी घेत आहे: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:51 PM2021-03-10T12:51:09+5:302021-03-10T12:52:56+5:30
देशव्यापी कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लस घेतली आहे.
मुंबई : सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर देशव्यापी कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते, मंत्री, लोकप्रतिनिधींनी कोरोना लस घेतली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लस घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (shiv sena leader sanjay raut cleared that he took corona vaccine)
संसदेत कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. आपणही लस टोचून घ्यावी, असा विचार केला आणि लस टोचून घेतली. त्यानंतर आता थोडासा हात दुखतोय. पण ठीक आहे. काळजी घेतोय, असे संजय राऊत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर
सरकारवर खापर फोडता येणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार आपल्याला लॉकडाऊन परवडणार नाही, असे सांगत आहेत. मुंबईकरांनी नियमांचे पालन केले पाहिजे. मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील जनतेने नियम पाळले नाहीत. मुख्यंत्र्यांनी आवाहन केले आहे की, निर्बंध पाळा. नियम पाळा. मात्र, तसे होताना दिसत नाही. आता लॉकडाऊन टाळणे जनतेच्या हातात आहे. सरकारवर त्याचे खापर फोडता येणार नाही, असे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. लोक ज्या प्रकारे गर्दी करत आहेत, लोक ज्या प्रकारे मास्क वापरत नाहीत, अशा अनेक गोष्टी आहेत. लोकांनी निर्बंध स्वतःहून पाळले पाहिजेत, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केले.
हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचे करू नये
मुनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचे करू नका, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा. त्यासाठी राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.