ठाण्यात फेरीवाल्यानं केलं ते दुर्देवी, राज्य सरकारकडून कारवाई केली जातेय : संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:30 PM2021-08-31T13:30:36+5:302021-08-31T13:31:23+5:30
ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यानं केला होता चाकूहल्ला.
कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
"ठाण्यात फेरीवाल्यानं जे केलं ते दुर्दैवी आहे, त्यावर कडक कारवाई राज्य सरकार करत आहे. सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेतला आहे," अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यास पोलिसांनी अटक केली असून अमरजीत यादव असं त्याचं नाव आहे. सोमवारी पिंपळे यांचं पथक घोडबंदरच्या कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरू होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतानाच संतप्त झालेल्या यादव यानं रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून खाली पडली.
राज ठाकरेंकडूनही संताप व्यक्त
सदर घटनेवर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी," असं राज ठाकरे यांनी सांगितले. "आजपर्यंत कोणी असा अधिकाऱ्यांवर हल्ला केला नव्हता. आज हल्ला केलाय आणि त्याला पोलिसांनी अटक केली. उद्या तोच जामिनावर सुटेल व पुन्हा हल्ला करायला मोकळा असेल. मात्र ज्या दिवशी हल्लाखोर फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याचदिवशी त्याला मनसैनिक चोप देतील. भीती काय असते ते त्याला दाखवून देऊ," असा इशारा राज ठाकरे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिला.