नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे?; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना 'रोखठोक' सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 08:41 AM2021-11-28T08:41:10+5:302021-11-28T08:41:35+5:30
Sanjay Raut : ठाकरी बाण्याने राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, राऊत यांचा निशाणा.
महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकारला दोन वर्षे होत आहेत. त्याच वेळी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेलाच घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासही दोन वर्षे झाली. मागच्या दोन वर्षांत सरकार पाडू न शकलेला विरोधी पक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देतोय हा विनोद म्हणावा लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री ठाकरे आज प्रकृतीच्या कारणाने इस्पितळात आहेत, पण ठाकरी बाण्याने राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झाला. राजकारणात सदैव खोटेपणाचा जय होतोच असे नाही. विरोधी पक्षाने नक्की काय गमावले?, असेही राऊत म्हणाले. राऊत यांनी रोखठोक या सदरातून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच घेतली त्या सोहळ्यासही दोन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या पाठीच्या दुखण्यामुळे इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे, पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे ती राज्यातील विरोधी पक्षाची, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.
भ्रमातून बाहेर पडावे
सरकारला दोन वर्षे झाली त्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’’ म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्यापि बाहेर पडलेला नाही. ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी इतकेच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? हेच पाटील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीत म्हणाले होते, ‘‘सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे. आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल.’’ तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात, असेही राऊत रोकठकमधून म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे हे गेल्या दोन वर्षांत सगळय़ांना पुरून उरले आहेत. गेल्या दोन वर्षांत ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी व कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी कोणतीच कसर सोडली नाही. ज्याला राजकारणात ‘बिलो द बेल्ट’ म्हटले जाते ते सर्व कमरेखालचे वार करूनही सरकार कायम असल्याचे त्यांनी सांगितले.