कृषीमंत्री आसाममधील चिंतन शिबिरात अन् शेतकरी वाऱ्यावर, संजय राऊतांचा दादा भुसेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:38 PM2022-06-24T16:38:01+5:302022-06-24T16:39:28+5:30
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दादा भुसे यांनी टोला लगावला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. यामध्ये राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada bhuse) सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दादा भुसे यांनी टोला लगावला आहे.
सध्या राज्यात पाऊस कमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या, असे म्हणत संजय राऊत यांनी भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. "खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या", असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच, ट्विट करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी टॅग केले आहे.
खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 24, 2022
सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत.
राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामध्ये कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. दरम्यान, दादा भुसे हे नाशिकमधील आमदार असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत जोडलेले आहेत.