हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही; संजय राऊतांचं शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 11:44 AM2019-12-22T11:44:03+5:302019-12-22T11:46:03+5:30
राहत इंदोरींच्या ओळी ट्विट करत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा
मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. नवा कायदा देशहिताचा असल्याचं म्हणत भाजपाकडून या कायद्याचं समर्थन केलं जात आहे. तर विरोधकांनी हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचं म्हणत देशभरात आंदोलनं सुरू केली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोदी सरकार आणि भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.
सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है, या राहत इंदोरी यांच्या ओळी संजय राऊत यांनी ट्विट केल्या आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण तापलं असताना राऊत यांनी हे ट्विट केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्यामुळे या तीन देशांमधून भारतात आलेल्या मुस्लिमेतर समुदायांना (हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध, ख्रिश्चन) भारताचं नागरिकत्व मिळू शकेल. हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणार असल्यानं तो संविधानविरोधी असल्याचा आक्षेप काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी नोंदवला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 22, 2019
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य केलं होतं. नव्या कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. मात्र नागरिकांनी काळजी करू नये. त्यांच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी हिवाळी अधिवेशनानंतर बोलताना दिली. राज्यातल्या जनतेनं मनात कोणतेही गैरसमज ठेवू नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.