... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला
By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 11:50 AM2021-01-02T11:50:38+5:302021-01-02T11:57:43+5:30
सामनातील संपादकीय विषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं म्हणाले होते चंद्रकांत पाटील
काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली. यानंतर यानंतर शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निशाणा साधला. जर चंद्रकांत पाटील हे सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील असं म्हणत राऊत यांनी त्यांना टोला लगावला.
"चंद्रकांत पाटील कालपर्यंत सामना वाचत नव्हते. आज ते वाचायला लागले हिच मोठी बाब आहे. जर ते सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होती. सकारात्मक दृष्टीकोनातून ते महाराष्ट्र आणि देशाकडे पाहतील. सामना वाचत राहतील तर त्यांना महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वासही त्यांना येईल," असं राऊत म्हणाले.
यावेळी राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावरही भाष्य केलं. "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच त्यांचं प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही," असंही त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले होते पाटील?
"मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो," असं पाटील म्हणाले होते. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती भाषा रश्मी ठाकरे या संपादका असलेलं संपादकीय असूच शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.