फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते; राऊतांचा रोखठोक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 10:33 AM2022-07-03T10:33:20+5:302022-07-03T10:33:20+5:30
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे - संजय राऊत
सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून यावरून संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व त्यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले हाच खरा भूकंप आहे! श्फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते! आता राज्यात काय होणार?, असे म्हणत राऊत यांनी त्यांना टोला लगावला. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून फडणवीसांवर निशाणा साधला.
काय म्हटलं राऊत यांनी?
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील एक पर्व संपले. जेमतेम अडीच वर्षांचाच हा कालखंड, पण बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुक्त झाले. पाच वर्षांसाठी स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांतच कोसळले, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत ते सोडा, पण हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले व त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिले, असेही त्यांनी नमूद केले आहे.
पक्ष जनतेच्या नजरेसमोर बदला
जर कोणाला पक्ष बदलायचा असेल तर त्याने जनतेच्या नजरेसमोर बदलला पाहिजे. त्याच्यात जनतेला तोंड देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. आमच्या लोकशाहीला तेव्हाच बळ लाभेल की, जेव्हा पक्ष बदलणारा राजीनामा देऊन पुन्हा जनतेत जाईल. तसे न करणाऱ्यांना कायद्याने बाद केले पाहिजे व पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात वेगळे घडवले गेले. पक्ष बदलणाऱ्या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवले व राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे ‘पेढे’ खाल्ले, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील भाजप अंधारात
हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते, असेही राऊत यांनी आपल्या सदरात म्हटले आहे.