सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:27 AM2022-07-19T10:27:16+5:302022-07-19T10:27:19+5:30
लढाई चिन्हाची असेल, पक्षाची असेल कोणतीही असेल तरीही आम्ही त्याच्याशी दोन हात करण्यास समर्थ आहोत - राऊत
“शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी व्यवस्था केली आहे, त्यानुसार हे चालतं. त्यांना महाराष्ट्र तोडायचाय म्हणून शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीत जातो, त्यांचा काही भरवसा नाही. नशेची, सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात. उद्या मातोश्री आमचं आहे म्हणत कब्जाही करू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनच केली नाही असंही ते म्हणू शकतात. अशी यांची वैचारिक पातळी उंचावली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या भविष्याचा निर्णय घेणारी सुनावणी सुरू होणार आहे. त्याच अस्वस्थतेतून मुख्यमंत्र्यांच्या भेटी सुरू आहेत. न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तरी रामशास्त्री बाण्याचे काही न्यायमूर्ती आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रसेवाच घडेल, याची खात्री शिवसेनेला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“५० आमदारांच्या घरावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलाच होता आता खासदारांच्या घरावरी होतोय. पोलीस बळाचा वापर केला जात आहे, पैशाचा वापर आणि ब्लॅकमेलिंगही केलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला सामना करायला बाळासाहेबांची शिवसेना तयार आहे. मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर तो त्यांचा नियमित दौरा आहे. ते भाजपचे मुख्यमत्री आहेत. त्यांचं हायकमांड येथे आहे. मंत्रिमळ तयार करायचं आहे, नावं अंतिम करायची आहे, तर यावं लागेल. मी शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री पाहिले आहेत, ते कधी मंत्रिमंडळाची यादी घेऊन किंवा सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आले होते हे माहित नाही. त्या काळी सर्व चर्चा मुंबईत होत होती. ते कोणते प्रश्न घेऊन येथे आले असतील तर टीका करणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
दोन हात करण्यासाठी समर्थ
“लढाई चिन्हाची असेल, पक्षाची असेल कोणतीही असेल तरीही आम्ही त्याच्याशी दोन हात करण्यास समर्थ आहोत. ज्या पद्धतीनं छुपे वार सुरू आहेत, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते भाजपते लोक जाहीररित्या बोलत आहेत. ते तीन तुकडे करण्यासाठी शिवसेनेचे तुकडे करू इच्छित आहेत. अखंड शिवसेना फोडा, ताकद कमी करा. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार खासदार पाठित खंजीर खुपसून जात असतील तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. केवळ आमदार आणि खासदार शिवसेनेची ताकद नाही. यातूनही शिवसेना पुन्हा उभी राहिल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांच्या घराबाहेर पहारे लागलेत त्यांना कोणत्याही सभागृहात येणं कठिण करून असा इशाराही त्यांनी दिला. संजय जाधव यांच्याबद्दलच्या बातम्या येत असून ते त्यामुळे अस्वस्थ असल्याचंही त्यांनी सांगितलं.