"सूरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांना स्मृतिभ्रंश; गद्दारांनी राजीनामे देऊन दाखवावे!"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 03:28 PM2022-07-23T15:28:46+5:302022-07-23T15:30:59+5:30

संपर्कप्रमुख संजय सावंत हे आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Shiv sena leader Sanjay sawant says Amnesiac to Gulab Rao patil due to Surat, Guwahati tour traitors should resign!" | "सूरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांना स्मृतिभ्रंश; गद्दारांनी राजीनामे देऊन दाखवावे!"

"सूरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांना स्मृतिभ्रंश; गद्दारांनी राजीनामे देऊन दाखवावे!"

Next

जळगाव - प्रत्येक शिवसैनिकासाठी शाखा म्हणजे मंदिर असते. यामुळे त्या मंदिरात जाण्यात काहीही गैर नाही. कारण ज्यांना पक्षाबाबतची निष्ठा असते, तेच या मंदिरात जातात व ज्यांना पैसे व ठेक्यांचे आमिष असते तेच गद्दारी करतात, अशा शब्दात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शाखा म्हणजे शिवसेनेचा आत्मा असून, याठिकाणी आम्हाला जाण्यात काहीही गैर वाटत नसल्याचेही  सावंत यांनी सांगितले.
 
संपर्कप्रमुख संजय सावंत हे आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सुनील ठाकूर, जाकीर पठाण यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 शिवसेनेचे आमदार आमच्यासाठी गद्दार असून, त्यांनी आधी राजीनामे द्यावेत. मग दिसून जाईल की जनता कोणासोबत आहे? असे आव्हान सावंत यांनी दिले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पक्ष सोडताना आधी आमदारकीचा राजीनामा दिला होता, तशी हिंमत गद्दार आमदारांनी दाखवावी, असे आव्हानही सावंत यांनी दिले. 

सुरत, गुवाहाटी दौऱ्यामुळे गुलाबरावांचा स्मृतिभ्रंश
गुलाबराव पाटलांनी मला शिवसेनेसाठी काय काम केले? हे विचारु नये. जळगावसह विदर्भातील तापमानाचाही आम्हाला अंदाज आहे. गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्रीपद असतानाही त्यांच्या मतदारसंघाव्यतिरिक्त पक्षासाठी काय काम केले? असाही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. एक-दीड महिन्यापूर्वी माझी स्तुती करणाऱ्या गुलाबराव पाटलांना अवघ्या महिनाभरात नेमके काय झाले? सुरत, गुवाहाटी, गोव्याच्या दौऱ्यामुळे गुलाबराव पाटील यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे का? असाही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.

विकासासाठी अडथळा आणल्यास जळगावकर मातीत गाडतील - 
जळगाव शहराच्या विकासासाठी १२० कोटींचा निधी दिला असल्याचे सांगत गुलाबराव पाटील एकप्रकारे मनपातील पदाधिकाऱ्यांना धमकीच देत आहेत. मात्र, जळगाव शहरातील विकासकामांमध्ये अडथळा निर्माण केल्यास जळगावकर त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा संतप्त शब्दात सावंत यांनी उत्तर दिले आहे. ज्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच पक्ष सोडला होता, त्यांनीच पुन्हा प्रवेश केला. त्यामुळे ६० जणांचा हा प्रवेश म्हणजे भूकंप नसून, तो फुसका बारच अधिक असल्याचे सावंत म्हणाले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हे गुलाबरावांचा चेहरा पाहूनच समजून जाते, असेही सावंत म्हणाले.

Web Title: Shiv sena leader Sanjay sawant says Amnesiac to Gulab Rao patil due to Surat, Guwahati tour traitors should resign!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.