शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये, थोडी जरी नैतिकता असेल तर...; SC च्या निकालानंतर राऊत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 02:29 PM2023-05-11T14:29:57+5:302023-05-11T14:30:28+5:30
"सरकारने शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये."
गेल्या तब्बल ११ महिन्यांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आला आहे. यात, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आता पुन्हा त्यांना मुख्यमंत्री ठेवता येणार नाही. याच बरोबर, शिंदे सरकार कायम राहणार असून, 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षच निर्णय घेतील, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, "सरकारने, शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये, अशा शब्दात शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
...हे सर्वच जर बेकायदेशीर, तर मग कायदेशीर काय? -
राऊत म्हणाले, "राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत चाचणी झाली यानंतर एकमेकांना व्हिप बजावण्यात आले. हे सर्वच जर बेकायदेशीर ठरत आहे, तर मग कायदेशीर काय आहे? सरकारने शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये. आपण बेकायदेशीर सरकारचे प्रतिनिधित्व करत आहात. जर थोडी जरी नैतिकता असेल आणि खोक्यांची पापं धुवून काढायची असतील, तर सरकारने ताबडतोब राजिनामा द्यायला हवा".
'त्या' 16 आमदारां संदर्भात काय म्हणाले राऊत? -
"आता 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेसल तर येऊ द्या. जर व्हिपच बेकायदेशी आहे, संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, मग विधानसभा अध्यक्षांनी त्या बेकायदेशीर प्रक्रियेवर आपली भूमिका घ्याला हवी. जर घटनेनुसार देश चालणार असेल, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधानसभा अध्यक्षांनी आपण संविधानाच्या बाजूने आहोत की, घटनाबाहाय्य बेकायदेशीर लोकांच्या बाजूने आहोत? हे बघायला हवे", असेही राऊत म्हणाले.