Maharashtra Politics: “रामदास कदम चिल्लर माणूस, यापुढे राज्यात फिरुन दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिलं ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:09 PM2022-09-20T19:09:07+5:302022-09-20T19:10:14+5:30
Maharashtra News: सरड्यापेक्षा जास्त वेगाने रामदास कदम रंग बदलतायत, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या बैठका, दौऱ्यांचे सत्र सुरूच आहे. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, रामदास कदम यांनी राज्यभरात फिरुन दाखवावे, असे खुले आव्हान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दापोलीत झालेल्या जाहीर सभेत रामदास कदम यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यात ठिकाणी रामदास कदम यांनी सभा घेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला. रामदास कदम हे वारंवार ठाकरे कुटुंबाबाबत अपशब्द वापरून टीका करीत आहेत. याविरोधात राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच रामदास कदम यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
रामदास कदम चिल्लर माणूस, राज्यात फिरुन दाखवावे
रामदास कदम चिल्लर माणूस असून, राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा अंधारे यांनी दिला आहे. तसेच शिवसेना नेत्यांनी तुमच्यावर टीका केली असेल पण तुमच्या कुटुंबावर कुणी घसरले नाही. तरीही तुम्ही वैयक्तिक पातळीवर घसरता? सरड्यापेक्षा जास्त वेगाने तुम्ही रंग बदलतायत. ज्या मराठवाड्यात तुम्ही शिवसेना संपर्कप्रमुख होतात, त्याच मराठवाड्यातील लातूर आणि बीडमध्ये तुम्ही खरेच येऊन दाखवा. रामदास कदम यांच्यात अचानक एवढी ताकद कुठून आली. रामदास कदम एकदम निष्ठेची भाषा बोलू लागलेत. ज्यांच्या मांडीवर जाऊन बसताय. तीच मंडळी तुमचा पगार किती, तुमची निष्ठा किती असा सवाल करत होते, पण त्याकडेही तुम्ही लक्ष देत नाही, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.
दरम्यान, राज्यतील विविध ठिकाणी रामदास कदम यांच्या निषेध केला जात असून, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन शिवसैनिकांकडून केले जात आहे. रत्नागिरी, दापोली, रायगड, ठाणे यांसारख्या अनेक ठिकाणी शिवसैनिक रामदास कदम यांच्याविरोधात संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. नजीकच्या काळात रामदास कदम आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, रामदास कदम याला कसे उत्तर देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागू राहिले आहे.