आम्ही लाचार नव्हे तर स्वाभिमानी शिवसैनिक; खासदार संदीपान भुमरेंचा राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 05:59 PM2024-06-19T17:59:19+5:302024-06-19T18:00:08+5:30
संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता टीका टिप्पणी करायला पुढे येतात. त्यामुळे त्यांच्यावर फारसं लक्ष न दिलेले चांगले आहे असं त्यांनी सांगितले.
मुंबई - संजय राऊत काय बोलतात त्याला अर्थ नाही. आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक असून ते लाचार आहेत अशा शब्दात छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
संदीपान भुमरे म्हणाले की, शिवसेनेचा ५८ वर्धापन दिन असून यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच हा दिन साजरा होतोय. त्यामुळे आनंदात उत्साहात हा दिवस साजरा होईल. आम्ही पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक होतो आणि आजही आहोत. लाचारी आम्ही करत नाही. संजय राऊत वारकऱ्यांचा अपमान करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांचा सन्मानपूर्वक मदत करतात. वारकऱ्यांना कुणी विकत घेऊ शकत नाही. संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता टीका टिप्पणी करायला पुढे येतात. त्यामुळे त्यांच्यावर फारसं लक्ष न दिलेले चांगले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महायुती भक्कम आहे. कुठेही कुजबूज नाही. नाराजी नाही. निवडणुकीत वेगवेगळी गणिते मांडली जातात. विधानसभेत ही महायुती ताकद दाखवून पुन्हा महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकवेल. लोकसभेला संविधान बदलणार यामुळे थोडाफार परिणाम झाला तो विधानसभेला होणार नाही. महायुतीचा झेंडा विधानसभेला फडकेल त्यात कुठेही अडथळा येणार नाही असं मत खासदार संदीपान भुमरे यांनी मांडले.
दरम्यान, नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी स्वत: शासनाच्या वतीने आम्ही गेलो. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी जो निरोप दिला तो आम्ही पोहचवला. ओबीसींचे शिष्टमंडळही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहे. मुख्यमंत्री ओबीसी आंदोलनाबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेतील अशी माहितीही खासदार संदीपान भुमरे यांनी दिली.
सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार कुणी सोडले?
आपल्या विचारांशी घट्ट असणाऱ्या, कधीही विचारांशी तडजोड न करणारे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही असं म्हटलं होतं. मग खरी शिवसेना कुणाची? अडीच वर्ष तुम्ही काँग्रेससोबत गेलात, सत्तेसाठी काँग्रेसच्या विचारांना मिठी मारली ती शिवसेना खरी कशी समजणार? त्यामुळे खरी शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे आहे. अडीच वर्ष तुम्ही काँग्रेससोबत का गेला, बाळासाहेबांच्या विचारांपासून सत्तेसाठी दूर झाले, आम्ही केवळ ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अडीच वर्ष मविआत खंडीत झाले होते. ते विचार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुढे घेऊन जात आहे असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाला लगावला.