मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बमुळे शिवसेनेत नाराजी; बालेकिल्ल्याला लवकरच मोठी गळती?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 12:02 PM2022-04-05T12:02:00+5:302022-04-05T12:04:35+5:30
मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी संदर्भात लिहिलेल्या पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज
मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणार रिफायनरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पक्षात नाराजी आहे. शिवसेनेची भूमिका का बदलली, अशी विचारणा राजापुरातील पदाधिकाऱ्यांकडे स्थानिक करत आहेत. त्यांना उत्तर देणं पदाधिकाऱ्यांना अवघड जात आहे. राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षप्रमुखांनी आपल्याला विचारात न घेतल्यानं ही नाराजी आहे. त्यामुळे लवकरच या भागात शिवसेनेला मोठी गळती लागण्याची शक्यता आहे.
सध्या शिवसेना राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवत आहे. पण रिफायनरीबद्दल शिवसेनेचा सूर बदलल्यानं राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे, गोवळ आणि शिवणे खुर्द या गावांमध्ये पक्षाबद्दल मोठी नाराजी आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसंपर्क अभियान राबवलं जाणार नाही.
राजापुरात सोमवारी दुपारी शिवसंपर्क अभियानच्या नियोजनाबद्दल बैठक झाली. यावेळी रिफायनरीमुळे चर्चेत आलेल्या गावांबाबत चर्चा झाली. सध्या या ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्यास एखादा गंभीर प्रकार घडण्याची भीती काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर वस्तुस्थिती समजून घेत या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान न राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.
आगामी काळात जिल्हा आणि तालुका स्तरावरील काही कार्यकर्ते आणि नेते आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राजापूर पश्चिम भागात शिवसेनेत मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. काही स्थानिक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या या पत्रामुळे आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे प्रचंड नाराज आहेत. पक्षप्रमुखांनी भूमिका बदलल्यामुळे स्थानिकांना काय उत्तर द्यायची असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे.