शिवसेनेने सोडला ‘साठी’चा हट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 04:54 AM2017-01-24T04:54:10+5:302017-01-24T04:54:10+5:30

‘साठ जागा द्या, नाहीतर घरी जा,’ अशी ताठर भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने नमते घेत, भाजपाला साठपेक्षा अधिक जागा देण्याची तयारी दर्शविल्याने

Shiv Sena left the 'for' | शिवसेनेने सोडला ‘साठी’चा हट्ट

शिवसेनेने सोडला ‘साठी’चा हट्ट

Next

यदु जोशी /मुंबई
‘साठ जागा द्या, नाहीतर घरी जा,’ अशी ताठर भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने नमते घेत, भाजपाला साठपेक्षा अधिक जागा देण्याची तयारी दर्शविल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीत युती होण्याची आशा अजूनही जिवंत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री आज दुपारी नागपूरला रवाना झाले. ते रात्री उशिरा परत येणार असून, उद्या मुंबईतील दोन कार्यक्रम आटोपून दिवसभरासाठी नवी दिल्लीला जाणार आहेत. तत्पूर्वी ते युतीबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सुत्रांनी सांगितले.
२०१२ च्या निवडणुकीत भाजपाने युतीमध्ये ६३ जागा लढविल्या होत्या. त्याहीपेक्षा तीन कमी म्हणजे ६० जागांची आॅफर शिवसेनेने देऊ केल्याने मुंबईतील भाजप नेत्यांचा पारा चढला होता. त्यामुळे युतीची बोलणी अर्ध्यावरच थांबली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर केला. त्यावेळी युतीसंदर्भात कोणतेही थेट भाष्य न करता ‘बोलणी सुरू आहे’ एवढेच सूचक वाक्य उच्चारून युतीची शक्यता अजुनही जिवंत असल्याचा संकेत त्यांनी दिला.
सूत्रांनी सांगितले की, भाजपाला ८० ते ९० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेकडून दर्शविली जाऊ शकते. या ९० जागांतूनच भाजपाने आपले मित्र पक्ष रिपाइं, शिवसंग्राम आदींना जागा द्याव्यात, असे शिवसेनेकडून सांगितले जाऊ शकते. भाजपचे नेते १०० जागांसाठी आग्रही असले, तरी पाच-सात कमी जागा स्वीकारुन तडजोडही केली जाऊ शकते.
युती होणार की नाही, हाच सध्या मुंबईत चर्चेचा विषय आहे. शिवसेनेने निवडणुकीसाठी तयार केलेल्या काही व्हिडीओ जाहिरातींमध्ये ‘शिवसेनेला एकहाती सत्ता द्या’ असे आवाहन करण्यात आले आहे. याचाच अर्थ शिवसेनेने स्वबळाची देखील तयारी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी पुणे येथे पत्रकारांना सांगितले की, युतीबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे.
शेलार नरमले
५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर लावला जाणार नाही, अशी निवडणूक घोषणा उद्धव ठाकरे यांनी करताच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी, ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी आधीच केलेली असून शिवसेना ती हायजॅक करीत असल्याची टीका तत्काळ केली होती. तथापि, आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वचननामा जाहीर केल्यानंतरही शेलार यांनी त्यावर भाष्य केले नाही. ‘युती व्हावी ही आमची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर मी बोलणार नाही. उद्या युती झाली तर जाहीरनामा एकत्र प्रसिद्ध करू’ असे सांगून त्यांनी मवाळ भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांवरून शेलार नरमले अशी चर्चा आहे.

एकीकडे भाजपा-संघ, दुसरीकडे विकास
भाजपाचे मुंबईतील नेते आणि रा.स्व.संघाच्या मुंबईतील रचनेमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले नेते हे ‘युती करू नये’ या मताचे आहेत. उद्धव ठाकरेंशी संबंध असलेले मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर युती व्हावी, या मताचे आहेत. या ओढाताणीत युतीबाबत आरपारचा निर्णय मुख्यमंत्री अद्याप घेऊ शकलेले नाहीत.
भाजपा व संघात समन्वयाचे काम करणाऱ्यांनी गेले काही दिवस संघाच्या नेत्यांची मते जाणून घेतली. युती न करता भाजपाने दमदार अस्तित्व दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचे मत संघ धुरिणांनी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
फडणवीस यांनी उद्धव यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवत युतीचे सरकार चालविले आहे. दोघांमध्ये नियमित संवादही असतो. युती झाली नाही, तर सेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही, पण दोन पक्षांमध्ये प्रचारात कटुता निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांना ही कटुता टाळायची आहे.

Web Title: Shiv Sena left the 'for'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.