शिवसेना दुसऱ्या पर्यायाच्या शोधात, काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 03:11 AM2019-11-09T03:11:15+5:302019-11-09T03:11:46+5:30
आघाडीकडून अपेक्षा; काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा
मुंबई : मुख्यमंत्री पद सोडण्यास भाजपची तयारी नसल्यामुळे शिवसेना आता सरकार स्थापन करण्यासाठी दुसºया पर्यायाच्या शोधात असून महाआघाडीचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वाधिक १०५ सदस्या संख्या असलेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे आता ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला सत्तेचे वेध लागले आहेत. मात्र स्वबळावर सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ त्यांच्याकडे नसल्याने काँग्रेस (४४) आणि राष्टÑवादी काँग्रेसचा (५४) पाठिंब्यावर त्यांना सरकार स्थापन करावे लागेल.
शिवसेना नेते खा. संजय राऊत वारंवार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर चकरा मारत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचा पुनरुच्चार केला आहे. याचाच अर्थ सेनेने आघाडीतील नेत्यांशी संपर्क साधला असल्याचे समजते. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात मतभेद आहेत. पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने आधी केंद्र सरकार आणि एनडीएतून बाहेर पडावे, अशी अट काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाी घातली आहे. शिवाय, शिवसेनेची कट्टर हिंदुत्वावादी भूमिका राष्टÑीय राजकारणात काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे काँग्रेस नेते सावध भूमिकेत आहेत.
अभूतपूर्व परिस्थिती
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी सांयकाळी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ आहे, त्या भाजपने सरकार स्थापनेचा दावा करावा. राज्यपालांनी राज्य घटनेतील तरतुदींचे पालन करून लवकरात लवकर सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे.