ती ऑडियो क्लिप भोवणार, Ramdas Kadam यांची आमदारकी जाणार? शिवसेनेकडून नवा उमेदवार देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 02:57 PM2021-10-19T14:57:44+5:302021-10-19T15:07:41+5:30
Ramdas Kadam News: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray कमालीचे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडियो क्लिपमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे कदम यांची आमदारकीही जाण्याची शक्यता आहे. रामदास कदम हे विधान परिषदेमधील आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीची मुदत येत्या जानेवारी महिन्यात संपत आहे. मात्र रामदास कदम यांना मुदतवाढ न देता त्यांच्या जागेसाठी नव्या उमेदवाराचा शोध शिवसेनेनेकडून सुरू करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लिप आता रामदास कदम यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होणार असल्याने या जागेवर पक्षाला उपयोग होईल आणि तळागाळातील लोकांच्या संपर्कात असेल, अशाच कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. तसेच या जागेसाठी मुंबईतील शिवसेनेचे काही विभागप्रमुखांसह युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची चाचपणी होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेमधून आमदारकी दिली होती. २०१४ मध्ये शिवसेना सत्तेस सहभागी झाल्यावर रामदास कदम यांना मंत्रिपदही देण्यात आले. तर २०१६ मध्ये त्यांना पुन्हा विधान परिषदेमध्ये पाठवण्यात आले.
शिवसेनेच्या कोकणातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक असलेल्या रामदास कदम यांची २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. त्यानंतर २००९ पर्यंत ते या पदावर होते. २००९ मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.