मराठवाड्यात शिवसेना काँग्रेससोबत

By admin | Published: March 15, 2017 12:34 AM2017-03-15T00:34:06+5:302017-03-15T00:34:06+5:30

मराठवाड्यातील सभापती, उपसभापती निवडीत शिवसेनेने काँग्रेससोबत घरोबा केला असून औरंगाबात जिल्ह्यात भाजपाला दूर ठेवण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत.

Shiv Sena with Marathwada Congress | मराठवाड्यात शिवसेना काँग्रेससोबत

मराठवाड्यात शिवसेना काँग्रेससोबत

Next

औरंगाबाद : मराठवाड्यातील सभापती, उपसभापती निवडीत शिवसेनेने काँग्रेससोबत घरोबा केला असून औरंगाबात जिल्ह्यात भाजपाला दूर ठेवण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत.
औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतीपदावर काँग्रेसच्या करमाड गणातील ताराबाई उकिर्डे या विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या गांधेली गणातील कविता राठोड यांची वर्णी लागली. औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ८, भाजपचे ७, शिवसेनेचे ३ आणि अपक्ष २ असे एकूण २० सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. सोयगाव पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ३, भाजपचे २ आणि शिवसेनेचे १ असे ६ पक्षीय बलाबल असून येथेही काँग्रेस- शिवसेना अशी युती झाली.
यामध्ये काँग्रेसचे धरमसिंग दारासिंग चव्हाण हे सभापती, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे साहेबराव जंगलू गायकवाड हे निवडून आले. कन्नड पंचायत समितीमध्ये रायभान जाधव विकास आघाडीचे ५, भाजपचे ५, शिवसेनेचे ३, काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १ असे एकूण १६ सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. आ. हर्षवर्धन जाधव यांनी ऐनवेळी काँग्रेससोबत हातमिळवणी करत सभापतीपद खेचून घेतले. आ. जाधव हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत.
आ. जाधव यांच्या आघाडीच्या पिशोर गणातील मीना मोकासे या सभापती, तर काँग्रेसच्या कुंजखेडा गणातील रुबिनाबी कुरेशी या उपसभापती पदी विजयी झाल्या. कन्नडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. याठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळाली.


जालना पंचायत समितीसाठी शिवसेना, काँग्रेस आघाडी
जालना जिल्ह्यातील आठ पैकी जाफराबाद, भोकरदन, मंठा आणि परतूर या चार पं.स.वर भाजपाने वर्चस्व मिळविले. अंबड आणि घनसावंगी पंचायत समिती राष्ट्रवादीकडे तर जालना, बदनापूर पं.स.वर शिवसेनेने वर्चस्व राखले. जालना पंचायत समितीसाठी शिवसेना, काँग्रेस युती होऊन सभापतीपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापती काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात यांची निवड झाली. ही नवीन राजकीय आघाडी चर्चेचा विषय ठरत आहे.

काँग्रेसने काढला
राष्ट्रवादीचा वचपा
लातूर जिल्ह्यात सात पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा फडकला आहे़ औसा पंचायत समितीत काठावर आलेल्या काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी एक सदस्यांची आवश्यकता होती़ विरोधात लढलेल्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी पाठिंबा देऊनही काँग्रेसने त्यांना अव्हेरले अन् मनसेच्या एका सदस्याला सोबत घेऊन सत्ता मिळवित मनसेला उपसभापतीपदही दिले.

परभणीत काँग्रेस-भाजपा
परभणी पंचायत समितीमध्ये काँग्रेसने भाजपासोबत युती करून तर पूर्णेत
राष्ट्रवादीने भाजपाला सोबत घेऊन सभापतीपद मिळविल्याचे मंगळवारी पाहावयास मिळाले. गंगाखेड पंचायत समितीत राष्ट्रीय समाज पक्ष, भाजपा आणि शिवसेना या पक्षांमध्ये युती होऊन रासपला सभापतीपद तर शिवसेनेला उपसभापतीपद मिळाले.
मानवत पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडी दरम्यान शिवसेनेतीलच वाद चव्हाट्यावर आला. सभापतीपदासाठी शिवसेनेच्या दोन गटांमध्येच निवडणूक झाली. खा. बंडू जाधव यांच्या गटाने बाजी मारीत आ.मोहन फड यांच्या गटाचा पराभव केला. येथे काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

बीडमध्ये राष्ट्रवादी - शिवसेना एकत्र
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू
अथवा मित्र असत नाही. याचा प्रत्यय मंगळवारी बीड जिल्ह्यात आला. पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीत गेवराई व बीडमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना हे पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्तेसाठी एकत्र आले. १६ सदस्यीय बीड पंचायत
समितीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते.
शिवसेना, शिवसंग्राम व भाजप यांची राजकीय भूमिका राष्ट्रवादीविरुद्ध आहे. मात्र, आता हे चार पक्ष येथे एकत्रित येऊन सत्तेची चवचाखणार आहेत. आ. विनायक मेटे व आ. जयदत्त क्षीरसागर हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. बीड पं.स. मध्ये पुतणे संदीप क्षीरसागर यांची कोंडी करण्यासाठी आ. क्षीरसागरांनी पारंपरिक शत्रूंशी हातमिळवणी केली. गेवराई पंचायत समितीसाठी आता दोन पंडित एकत्रित आले अन् भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांना चित केले. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता राखली.

उमरग्यात काँग्रेस-भाजपा एकत्र
उस्मानाबाद जिल्ह्यातील आठपैकी पाच पंचायत
समित्यांवर राष्ट्रवादीने झेंडा फडकविला आहे. तीन
पंचायत समित्या काँग्रेसकडे गेल्या असून, सेना-भाजपाला या निवडणुकीत नामुष्की पत्करावी लागली आहे. विशेष म्हणजे, सेनेच्या ताब्यात असलेल्या परंडा आणि कळंब पंचायत समितीतून सेनेला पायउतार व्हावे लागले आहे. उमरग्यात काँग्रेस आणि भाजपाची मैत्री अधिक घट्ट झाली असून, या दोघांनी एकत्रित येवून पंचायत समितीत सत्ता काबीज केली आहे.
जिल्ह्यातील आठपैकी भूम, परंडा, वाशी, कळंबसह उस्मानाबाद पंचायत समितीवर राष्ट्रवादीने सत्ता प्राप्त केली आहे. तर उमरगा, लोहारा, तुळजापुरात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पंचायत समित्या आल्या आहेत. उमरगा पंचायत समितीतही काँग्रेस आणि भाजपा एकत्र नांदताना दिसणार आहेत.

हिंगोलीत शिवसेना आघाडीसमवेत
हिंगोली जिल्ह्यात पाचपैकी तीन पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत होते. त्रिशंकू स्थिती असलेल्या सेनगाव व हिंगोली पंचायत समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी सेनेने हातमिळवणी केली. त्यामुळे हिंगोलीत सेनेचा तर सेनगावात काँग्रेसचा सभापती झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात आधीपासूनच सेनेत भाजपविरोधी वातावरण होते तर काँग्रेसमध्येही तेच चित्र होते. काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व आघाडी केली असल्याने ते या निवडणुकीतही सोबत राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये फक्त भाजपच विरोधक म्हणून बाहेर राहिली आहे.

Web Title: Shiv Sena with Marathwada Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.