अन्यथा एमआयएमला घरात घुसून मारू : शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:12 PM2019-06-15T12:12:12+5:302019-06-15T12:28:46+5:30
आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा निसटता अपघाताने पराभव झाला.
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला होता. त्यानंतर आज शिवसनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून एमआयएमचा समाचार घेण्यात आला आहे. औरंगाबादचा हिंदू नामर्द बनलेला नाही. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्यांना 'औरंगाबादे'त घरात घुसून मारू, असा इशारा देत शिवसनेने एमआयएमवर निशाणा साधला.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातल्याने, पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढले होते. याच प्रकरणावरून शिवसनेने सामनामधून एमआयएमवर जोरदार हल्ला चढवला आहे. आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा निसटता अपघाताने पराभव झाला. मात्र, या पराभवामुळे हिंदू नामर्द बनला असे समजू नका. हिंदुच्या रक्षणासाठी 'औरंगाबादे'त घरात घुसून मारू. औरंगाबादच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनचा लढा चालूच राहील , असा इशारा सामनामधून देण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत खैरेंचा पराभव झाल्यापासून शिवसेना आणि एमआयएमधील वाद मोठ्याप्रमाणात वाढला आहे. औरंगाबाद महानगरपालिकीच्या शासकीय कार्यक्रमात जलील यांना डावलून माजी खासदार खैरे यांना बोलवल्यावरून काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादचे विकासाचे प्रश्न वगळून दोन्ही पक्षाच्या वादावादीतच पाच वर्षे जाणार तर नाही ना? असा प्रश्न औरंगाबादकरांना पडत आहे.
हर्षवर्धन जाधवांचा समाचार
सामनाच्या अग्रलेखातून एमआयएमसोबतच कन्नडचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावाई हर्षवर्धन जाधव यांचा सुद्धा समाचार घेण्यात आला आहे. औरंगाबादमधील शिवसनेचा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते, असे म्हणत जाधव यांच्यावर निशाणा साधण्यात आला. आपल्यातीलच दगा देणाऱ्या खानाने हातात हिरवे फडके बाधून नमाज अदा करावी असा टोला जाधव यांना शिवसनेने लगावला आहे.