"बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 11:21 PM2022-08-24T23:21:20+5:302022-08-24T23:21:41+5:30
हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला ४२ दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
मुंबई - मंत्र्यांना बंगले दिलेत, पण जिल्हे दिलेले नाहीत. पालकमंत्री आज गरजेचे आहेत. पण गद्दार सरकारचं लक्ष स्वतःवरच आहे जनतेवर नाही, अशी सडकून टीका शिवसेने नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधताना केली. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या चौकशीवर भाष्य करताना दिलखुलासपणे चौकशी करा आनंद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी सांगितले की, हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला ४२ दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही. खोके ओके हे काही झोमण्यासारखं नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदावर कुणाचा अंकुश नाही. विभागाच्या पुनर्रचनेत कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल कधीही निवडणुका घ्या आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. आधी नियुक्ती केली जाते मग थांबवली जाते. हे सरकार फक्त स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका आदित्य यांनी केली.
..अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिलं त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी 'गद्दार'हा शब्दच योग्य आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यांच्या मनात होते ते आम्ही पूर्ण केलं नाही
मिलिंद देवरा माझे मित्र आहेत. ही मैत्री आणखी वाढवायची होती. परंतु त्यांच्या मनात जे होते ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही. देवरांनी निवडणुकीवरून काही स्वप्न होती. त्यात मी जाणार नाही. परंतु जी काही चौकशी करायची ती करा. आम्ही जनतेची सेवा केली आहे असं सांगत आदित्य ठाकरेंनी देवरांच्या आरोपांना उत्तर दिले. त्याचसोबत आम्हाला मार्केटिंग करता आली नाही. मैत्री आहे तर निभवावी लागेल असंही आदित्य ठाकरे म्हणाले.