अब्दुल सत्तारांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता कमीच: रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 06:10 PM2019-11-17T18:10:40+5:302019-11-17T18:14:38+5:30
दानवे यांना खासदार करून आमचीच चूक झाली असल्याचे सत्तार म्हणाले होते.
- मोसीन शेख
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 24 दिवस उलटले असताना सुद्धा सत्तास्थापनेचा तिढा काही सुटायला तयार नाहीत. त्यातच आता भाजप-शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांना निवडून देण्याची आमच्याकडून चूक झाली असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला दानवे यांनी उत्तर दिले असून, सत्तार यांच्या डोक्यावर अजून पाच वर्षे केस उगवण्याची शक्यता कमी असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आज ( रविवारी ) शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर सेनेचे सर्वच आमदार आले होते. यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देतानी अब्दुल सत्तार यांनी खासदार दानवे यांच्यावर निशाणा साधला होता. मतांसाठी दानवे यांनी आपल्या मतदारसंघात हिंदुत्ववाद डावावर लावला होता. त्यामुळे लोकं जोड्याने मारू लागले आहेत, हे दानवे यांनी विसरू नयेत. तसेच दानवे यांना खासदार करून आमचीच चूक झाली असल्याचे सत्तार म्हणाले होते.
त्यामुळे आता सत्तार यांच्या टीकेला दानवे यांनी उत्तर दिले आहेत. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषेदत बोलताना दानवे म्हणाले की, सत्तार यांच्या डोक्यावर अजून पाच वर्षेतरी केस उगवणार नाहीत. त्यामुळे त्यांना टक्कल घेऊनचं फिरावे लागणार असल्याचा टोला दानवेंनी सत्तार यांना लगावला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत दानवे यांना पराभूत केल्याशिवाय आपण डोक्यावर केस उगवणार नसल्याची शपथ सत्तार यांनी घेतली होती.
लोकसभा-निवडणूक असोत की विधानसभा प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना मदत करुन शेजार धर्म पाळतात अशी ओळख कधीकाळी अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची राहलेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी या दोन्ही नेत्यांमध्ये अचानक कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला होता. त्यावेळी सत्तार हे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते. त्यातच आता भाजप-शिवसेना पक्षात निर्माण झालेल्या वादानंतर ह्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असल्याचे पाहायला मिळत आहे.