'शिवसेना आमदारांच ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 02:51 PM2019-11-17T14:51:14+5:302019-11-17T14:54:15+5:30
तिन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये बैठीकाचा पहिली फेरी झाली असून दुसऱ्या फेरीत शपथविधीची तयारी होणार आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 24 दिवस उलटले असताना सुद्धा अजूनही राज्यात सत्तास्थापन होऊ शकली नाही. भाजप-शिवसेना वेगळे झाल्याने, आता काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेकडून महाशिवआघाडीची सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु आहे. मात्र सत्तास्थापन झाल्यावर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सत्तार म्हणाले की, नवीन सरकार हे आठवड्याभरात स्थापन होईल. स्थापन होणारे नवीन सरकार कसे असावे याबाबतीत तिन्ही पक्षातील वाटाघाटी पूर्ण झाल्या असून, एक नवीन कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. तसेच तिन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये बैठीकाचा पहिली फेरी झाली असून दुसऱ्या फेरीत शपथविधीची तयारी होणार आहे.
त्यामुळे या आठवड्यात नवीन सरकार येणार असल्याचे सत्तार म्हणाले. तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असणार असल्याचे आम्ही सर्वांनी ठरवले आहे. मात्र याबाबतीत उद्धव ठाकरे यांनी काय ठरवले हे सांगता येणार नसल्याचे सुद्धा सत्तार म्हणाले. विशेष म्हणजे या आधी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी सुरु होती. तर आता शिवसेना आमदार यांनी सुद्धा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे ठरवले आहे.
तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर राज्यातील बड्या नेत्यांसह, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. शिवसेना आमदारांसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर आल्याचे पाहायला मिळाले.