मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना आमदारांचं नाराजीनाट्य; राऊतांचा हात जाधवांनी झटकला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:24 PM2020-02-17T18:24:03+5:302020-02-17T18:26:16+5:30
विनायक राऊतांनी स्वत: भास्कर जाधव यांना हात पकडून फोटोत येण्याची विनंती केली
रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी पुन्हा समोर आली. गणपतीपुळे येथील विकास आराखड्याच्या भूमीपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. याच कार्यक्रमात चक्क व्यासपीठावर भास्कर जाधव यांची नाराजी उघड उघड पाहायला मिळाली.
या व्यासपीठावर ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात येत होता त्यावेळी त्यांनी उपस्थित शिवसेना नेत्यांना एका फोटोत येण्याची विनंती केली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना फोटोत येण्यासाठी आवाज दिला. मात्र भास्कर जाधवांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. या व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, सुभाष देसाई यांच्यासह मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
विनायक राऊतांनी स्वत: भास्कर जाधव यांना हात पकडून फोटोत येण्याची विनंती केली त्यावेळी राऊतांचा हात झटकत भास्कर जाधवांनी तोंड फिरवलं. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समोरच घडला, त्यात प्रसारमाध्यमांच्या कॅमेरातही ही बाब कैद झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे घडलेल्या प्रकारावर काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचे आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना या दौऱ्यात महाविकास आघाडीतील नेते मंडळींही उपस्थित राहतील अशी शक्यता होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार नाही, राज्यात जशी महाविकास आघाडी झाली तशी रत्नागिरीत झालेली नाही. येथे शिवसेनेकडून केवळ आघाडीचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे अशी महाविकास आघाडी काय कामाची? त्यामुळेच या दौऱ्यावेळी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा आम्ही नेहमीच सन्मान करू. मात्र, केवळ दिखावा करण्यासाठी गणपतीपुळे येथे मुळीच जाणार नाही. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी एकही विकासकाम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात केलेले नाही. शहरातील सर्व कामे ही शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात होत आहेत. समतोल विकासाला साळवी यांनी तिलांजली दिली आहे. त्यामुळेच ही खोटी आघाडी मान्य नाही असा टोला राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांनी शिवसेनेला लगावला.