मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 05:43 PM2018-07-25T17:43:26+5:302018-07-25T18:27:07+5:30
मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
औरंगाबाद - मराठाआरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. औरंगाबादमधील कन्नड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभाध्यक्षांकडे ई मेलद्वारे राजीनामा पाठवला आहे.
मराठवाड्यामध्ये मराठाआरक्षण आंदोलन तीव्र झाल्यानंतर कन्नड मतदारसंघातील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते. बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश न निघाल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली होती. अखेर ही मुदत उलटून गेल्यानंतर दाघव यांनी आपला शब्द पाळत आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ.जाधव समर्थकांसह दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनास बसले होते. आमदार पदाचा राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. काकासाहेब शिंदे यांच्या कुटूंबियांना वैयक्तिक पाच लाखांची मदत केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा पाठविला आहे. तसेच स्वत: भेट घेऊन देखील त्यांच्याकडे राजीनाम्याची प्रत देण्यात येणार आहे.
अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करावे
विधीमंडळात वारंवार चर्चा उपस्थित करूनही मराठा आरक्षण जाहीर झालेले नाही. इतरही सामाजिक विषय सरकार गांभिर्याने विचार करण्यास तयार नाही. मराठा समाजाला अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करावे. अध्यादेश काढण्याचे अधिकार सरकारला आहे. विधानसभेला कायदा करण्याचे अधिकार सरकारला आहे. कोर्टासमोर जे विषय प्रलंबित आहेत, ती बाब वेगळी आहे. कायदा करण्याचे अधिकारी विधीमंडळाला आहे. विधीमंडळाने कायदा करून अध्यादेश काढावा.
राजीनामा २४ तासांत मंजूर करावा
विधानसभा अध्यक्षांनी माझा राजीनामा २४ तासांत मंजूर करावा, किंवा आरक्षण अध्यादेश काढावा. हा माझा अंतीम राजीनामा आहे. मुंबईहून परतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण सुरूच राहील,असे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे जाधव पहिले आमदार आहेत, त्यांना मराठा मावळा संघटनेचा पाठींबा असल्याचे अध्यक्ष प्रा.माणिकराव शिंदे यांनी सांगितले.