"जर आम्ही उठाव केला नसता तर..."; आमदार संजय शिरसाट यांचं भाजपा नेत्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:31 PM2023-06-14T18:31:44+5:302023-06-14T18:32:27+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. सुरक्षेची काळजी नसते. रात्री २ वाजताही लोकांची कामे करतात. त्यामुळे लोकांना ते पसंत पडत आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.
मुंबई - जर आम्ही उठाव केला नसता, सर्वस्व पणाला लावून पाऊल उचललं नसतं तर हे सरकार आले नसते हे निर्वावाद सत्य आहे. जर कुणाला वाटत असेल हे वरचढ होतायेत तो हा गैरसमज आहे. वाजपेयी सरकार एका मताने पडलेले पाहिलेले आहे. त्यामुळे नाराज कुणाला करू नका. हातात हात घेऊन काम करा असं आवाहन आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना-भाजपा वादाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ठाण्याचे नाही महाराष्ट्राचे आहे. अनिल बोंडे यांचे विधान युतीसाठी ठीक नाही. सगळे निर्णय घेण्याचे अधिकार वरिष्ठांना आहेत. जेवढे बोलायचे तेवढे कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून बोलावं. वाद होतात पण त्याचा फायदा विरोधकांना होतो. शिवसेना-भाजपा यांच्यात वाद आहे का या चर्चेला आपणच उधाण देतोय ते बरोबर नाही. वाद करू नये हे माझे स्पष्ट मत आहे. जागा कोणाला द्यायची हे ठरवणारे आपण नाही. वरिष्ठांना निर्णय घेऊद्या. तुमच्या अशा विधानांनी जर शिवसेना नेत्यांनी रागात चुकीचे विधान केले तर वाईट वाटून घेऊ नका. त्यामुळे अशी विधाने टाळली पाहिजेत असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत उत्साहाच्या भरात कुणी काही विधान केले तर युती तुटेल असं होत नाही. आपल्याला निवडणुकीत शिवसेना-भाजपा म्हणून लढायचंय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट बैठकीत सांगितले आहे. आपापाल्या भांडणामुळे युतीला तडा बसतो. आमच्या आलबेल नाही. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हातात हात घालून काम करतात. त्यात बाधा होईल अशी विधाने करू नका असंही आमदार शिरसाट यांनी खासदार अनिल बोंडे यांना सल्ला दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. सुरक्षेची काळजी नसते. रात्री २ वाजताही लोकांची कामे करतात. त्यामुळे लोकांना ते पसंत पडत आहेत. त्यामुळे पक्षाला फायदा होतो. त्याचसोबत युतीलाही त्याचा फायदा होतो. मुख्यमंत्री लोकांना भेटतात. कामे करतात हा युतीला फायदा आहे. सकारात्मक वातावरण युतीच्या बाजूने फिरतेय. स्वार्थासाठी काही विधाने करून युतीत बिघाड कशाला आणताय? असा सवाल त्यांनी शिंदेंवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना विचारला.
जागावाटपाबाबत वरिष्ठ ठरवतील
जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय वरिष्ठ घेतील. दर लोकसभेला, विधानसभेला जागावाटपात असे होते. कार्यकर्त्यांची मागणी असते ही जागा आपल्याला पाहिजे. ताकद वाढली पाहिजे. अखेर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात त्यानंतर सगळे कामाला लागतात. भाजपा-शिवसेनेचा कार्यकर्ता फिल्डवर काम करतात. आदेश आल्यानंतर कामाला लागतात असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.