तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 04:53 PM2023-08-24T16:53:40+5:302023-08-24T16:55:08+5:30
आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं.
मुंबई – आमची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा अशी होती. शिवसेना-भाजपा एकत्र राहू असं आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडली. आमदारांवर अन्याय होत होता. आम्ही तुमच्या दरवाजातच उभे होते. परंतु तुम्ही स्वत:ला कोंडून घेतले होते. कुणालाही भेटायचे नव्हते या भूमिकेमुळे हा उठाव करावा लागला अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, आज आम्ही शिवसेना-भाजपा एकत्र आहोत. उठाव करताना कुणाला आनंद झाला नाही. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब म्हणाले होते. परंतु ती नैतिकता पायदळी तुडवून उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी आघाडी केली. तुम्ही त्यांच्यासोबत का गेले? शिवसेनाप्रमुखांचा विचार, लोकांच्या मताचा अनादर करून तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. आज काँग्रेस-राष्ट्रवादी कुठेय, तुमची अवस्था काय झालीय. एककाळ असा होता जेव्हा मातोश्रीच्या दारात प्रत्येकजण यायचे आणि आज तुम्हाला लोकांच्या दारात जावे लागते. इंडिया आघाडीच्या लोकांसाठी जेवणावळी करावी लागते असं त्यांनी सांगितले.
तसेच आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं. त्याचसोबत अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर इथं मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. मराठवाड्यात ही बैठक होतेय. कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होतील. ज्यामुळे मराठवाड्याला न्याय मिळेल असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विरोधकांना आमची चिंता कशासाठी? मंत्रिपद मिळाले, नाही मिळाले, विस्तार झाला, नाही झाला याबाबत विरोधकांना कोण सांगेल. आमची चिंता करू नका. आमच्याबाबतीत एवढी सहानुभूती दाखवण्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे बघावे. जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती. तेव्हा दुसऱ्या पक्षाला २ मंत्रिपदे जास्त घेऊन त्यांना पद दिले. हे आठवले तर तुम्हीही कुणावर तरी अन्याय केला होता याची जाणीव सुप्रिया सुळेंना होईल असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
आम्ही आमचे उत्तर दिलंय
आम्ही आमचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. न्यायव्यवस्थेवर ज्यांचा विश्वास नाही. विरोधात निकाल गेला तर हे सगळे मॅनेज केलेय असा आरोप करतात. उशीर झाला तरी निकाल योग्य लागला पाहिजे. न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे अशी प्रतिक्रिया आमदार शिरसाट यांनी आमदार अपात्रेबाबतच्या प्रकरणावर दिली.