'दहावा, तेराव्याला असे अनेक कावळे फिरतात, ', शरद पवारांबद्दल शिवसेना आमदार शिंदेंचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:59 PM2024-09-10T12:59:24+5:302024-09-10T13:01:53+5:30
Sharad Pawar News : शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यातील दौऱ्याबद्दल बोलताना आमदार महेश शिंदे यांचा तोल सुटला. शरद पवार यांना कावळा म्हणत त्यांनी टीका केली.
Maharashtra politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, पक्षाची बांधणी आणि उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी शरद पवार राज्यात फिरताना दिसत आहेत. शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातही लक्ष्य घातल्याचे दिसत असून, त्यांच्या जिल्ह्यातील वाढत्या दौऱ्याबद्दल बोलताना शिवसेनाआमदार महेश बालदी पवारांना कावळा म्हणाले.
विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकारण तापू लागले आहे. नेत्यांचे दौरे वाढले असून, आमदार आणि इच्छुकांनीही आपापल्या मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही राज्यात फिरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या वाढत्या दौऱ्यांवर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी टीका केली.
आमदार शिंदे शरद पवारांना म्हणाले कावळा
शरद पवारांच्या सातारा आणि कोरेगाव मतदारसंघातील दौऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पवारांचे नाव न घेता निशाणा साधला. "दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरत असतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात", असे विधान आमदार शिंदेंनी केले.
शरद पवारांवरील टोकाच्या टीकेचा अजित पवारांना बसला झटका
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शरद पवारांना लक्ष्य केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवारांबद्दल विधान केले होते. त्याचा फटका बारामती लोकसभा निवडणुकीत बसल्याबद्दलची नाराजी अजित पवारांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती.