दुष्काळग्रस्त पैठणमधील आमदार पुत्राचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:38 PM2019-07-04T17:38:44+5:302019-07-04T19:02:23+5:30
पैठण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने, गुरवारी असलेला आपला वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णय विलास भुमरे यांनी घेतला होता.
मोसिन शेख
मुंबई - पैठण तालुक्याचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांचा आजचा वाढदिवस चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पैठण तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने सुरुवातीला त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे निर्णय घेतला होता, परंतु हा निर्णय एका रात्रीत बासनात गुंडाळून विलास भुमरे यांनी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला.
पैठण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने, गुरुवारी असलेला आपला वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णय विलास भुमरे यांनी घेतला होता. एवढच नाही तर, पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ तसेच कुठल्याही भेट वस्तू आणू नयेत, असे आवाहन त्यांनी केले होते.
वाढदिवस साजरा करण्याच्या मोह प्रत्येकालाच असतो. त्यात मग आमदार पुत्र आणि जिल्ह्याच्या दोन खात्याचे सभापती असल्यावर वाढदिवस कसा साजरा होणार नाही. त्यामुळेच की काय, दुष्काळामुळे वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णय घेतलेल्या विलास भूमरेंना सुद्धा मोह आवरता आला नसावा आणि त्यांनी जिल्हा परिषदमध्ये असलेल्या आपल्या कार्यलयात धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे पुष्पगुच्छ,पुष्पहार आणि शाल पण त्यांनी स्वीकारल्या.दुष्काळ असल्याने वाढदिवस साजरे न करण्याचे निर्णय आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी घेतले आहेत. मात्र वाढदिवस साजरा न करण्याचे निर्णय घेऊन धुमधडाक्यात वाढदिवस साजरे करणारे विलास भुमरे हे पहिलेच नेते असावे.
विलास भुमरे म्हणतात
वाढदिवस साजरा न करता गोर-गरीब ३ हजार विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप करण्याचे नियोजन मी केले आहे. तसेच कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचा आवाहन सुद्धा केले होते. परंतु कार्यकर्त्यांचे असलेले प्रेम, त्यामुळे ते शुभेच्छा देण्यासाठी आलेच. जनतेच्या प्रेमापोटी मला ती पुष्पगुच्छ स्वीकारावी लागले आणि वाढदिवस साजरा झाला.